आसुरी प्रवृत्तींना आवरा !

गेल्या काही वर्षांपासून अवाढव्य नरकासुर प्रतिमा उभारण्याचे पेव फुटले आहे. सणाच्या आडून कायदा हाती घेण्याचे वर्तन दरवर्षी कुठे ना कुठे होत असते. त्यांना सैल सोडल्यास भविष्यात प​रिस्थिती आणखी चिघळू शकते.

Story: संपादकीय |
22nd October, 11:44 pm
आसुरी प्रवृत्तींना आवरा !

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गेल्याच आठवड्यात सण आणि जनतेच्या आरोग्यावर भाष्य केले होते. सणांचा आनंद महत्त्वाचा आहेच, पण जनतेचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण तितकेच महत्त्वाचे असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले होते. दुर्दैवाने गोव्यासह देशभरात या विधानाच्या विपरीत वर्तन घडलेले दिसून आले. गोव्यात तर दोन ठिकाणी दिवाळीच्या सणाला गालबोट लावण्याचे प्रकार घडले. नरकासुराच्या अकराळ-विकराळ प्रतिमा बनविणे काही नवे नाही. मात्र अलीकडच्या काही वर्षांत बहुतेक ठिकाणी नरकासुर हा प्रकार सणाचा भाग कमी आणि दंगामस्ती करण्याचे माध्यम अधिक बनला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. सत्तरीतील होंडा आणि पणजीतील मळा भागात घडलेले प्रकार हे याच मनोवृत्तीचे द्योतक. होंडा येथे तर चक्क पोलिसांच्या समक्ष पोलीस चौकीसमोर जमावाने तक्रारदाराची कार पेटविण्याचा प्रयत्न केला. कर्णकर्कश संगीतामुळे तसेच फटाक्यांमुळे आपल्यासह कुटुंबियांना त्रास होत असल्याची तक्रार एका ग्रामस्थाने पोलिसांकडे केल्यामुळे खवळलेल्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणात काहींची धरपकड झाली आहे. मात्र सणाच्या नावाखाली घडलेला हा प्रकार गोव्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. दुसरीकडे, मर्यादेपेक्षा आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यासाठी मळा येथे गेलेल्या पोलिसांना युवकांचा रोष सहन करावा लागला. पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न काहींनी केला. या दोन घटना थेट कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आहेत. न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र त्याकडे पाठ फिरवून वर पोलिसांनाच वेठीस धरण्याचे प्रकार मुळीच समर्थनीय नाहीत.

खरे तर नरकासुर हे अनिष्ट वृत्तीचे प्रतीक. नरकचतुर्दशी दिवशी पहाटे नरकासुर प्रतिमा जाळून नंतर दिवाळी सण साजरा होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोव्यात गावोगावी आणि शहारात गल्लोगल्ली अवाढव्य नरकासुर प्रतिमा उभारण्याचे पेव फुटले आहे. त्यात सातत्याने भर पडत आहे. एका दृष्टीने नरकासुर प्रतिमा उभारणे हे कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण. अनेक ठिकाणी पदरमोड करून किंवा ऐच्छिक सार्वजनिक वर्गणीतून या नरकासुर प्रतिमा उभारल्या जातात. मात्र बऱ्याच ठिकाणी काही राजकीय नेत्यांचे युवकांच्या अशा गटांना प्रायोजकत्व मिळते. क्वचित स्थानिक व्यावसायिक आणि अन्य धनिक लोकांकडूनही देणग्या मिळतात. त्यामुळे फुकटचा आलेला पैसा आणि सणाच्या नावाखाली काही युवकांकडून वैयक्तिक रोष दाखविण्याचे माध्यम म्हणून नरकासुराचा वापर केला जातो. त्यातून कोणाच्या तरी घराजवळ नरकासुर तयार करण्याच्या सबबीखाली महिनाभर रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगाणा घालणे, नरकचतुर्दशीच्या पूर्वरात्री डीजेच्या आवाजाने लोकांना हैराण करणे असे प्रकार घडतात. डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज लहान मुले आणि आजारी​ वृद्धांसाठी घातक ठरतो. त्यामुळे पणजीतील सांतिनेज भागात काही वर्षांपूर्वी वयस्क रहिवासी नरकचतुर्दशीच्या आधी एक दिवस परगावी राहणे पसंत करत 

असत. अलीकडे न्यायालयीन हस्तक्षेप आणि पोलिसांची गस्त यामुळे तेथील स्थिती काहीशी सुधारली आहे. मात्र मळा येथे यंदा घडलेला प्रकार पाहता, कायद्याने आपले हात आणखी लांब करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांच्या अंगावर हात टाकणारी वृत्ती पुन्हा उफाळून येता नये, यासाठी पोलिसी खाक्या आणखी कडक करायला हवा.

नरकासुर प्रतिमा उभारणे मुळीच गैर नाही. तो सणाचाच एक भाग आहे. मात्र त्याचवेळी त्या नरकासुराला यमसदनी पाठवणाऱ्या श्रीकृष्णाचे गुण आपण अंगिकारतो का, हा खरा प्रश्न आहे. श्रीकृष्णाचे गुण राहिले दूरच, नरकासुरच काहींच्या अंगात प्रवेश केल्यासारखे वर्तन दरवर्षी कुठे ना कुठे होत असल्याचे दिसून येते. सणांना विकृत स्वरूप आणणाऱ्या या प्रवृत्ती आपल्यातीलच आहेत. त्यांना सैल सोडल्यास भविष्यात प​रिस्थिती आणखी चिघळू शकते. अशा स्थितीत जागरूक नागरिक आणि विशेषत: धर्म, संस्कृती रक्षणासाठी तत्पर असल्याचे चित्र उभे करणाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. अशा संवेदनशील परिस्थितीतच हे लोक नेमके अंतर्धान कसे काय पावतात हे कळण्यास मार्ग नाही. लोकप्रतिनिधींनीही कृतीशील होऊन या प्रवृत्तींना फोफावण्यापासून रोखायला हवे. केवळ आसुरी प्रतिमा जाळून भागणार नाही, आसुरी वृत्तींचाही नायनाट करायला हवा. त्याची जबाबदारी केवळ न्यायालये आणि पोलीस यांच्यावर सोपवून चालणार नाही​.