
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात एनडीए यशस्वी झाली. त्याचवेळी महाआघाडी मात्र या परीक्षेत ‘फेल’ झाली. एनडीएला सत्ताच्युत करण्यासाठी महाआघाडीने यावेळी मित्रपक्षांची संख्या वाढवली; मात्र ११ मतदारसंघांत महाआघाडीचे उमेदवार परस्परांशी लढणार असल्याने विरोधी मतफुटीचा फायदा एनडीएला होण्याची शक्यता आहे.
२४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी ६ (१२१ जागा) आणि ११ नोव्हेंबर (१२२ जागा) अशा दोन टप्प्यांत मतदान होत असून १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
एनडीएमध्ये भाजप, जेडीयू, एलजेपी, एचएएम आणि आरएलएम यांचा समावेश आहे. महाआघाडीत राजद, काँग्रेस, सीपीआय (एमएल), सीपीआय, सीपीएम, आयआयपी आणि मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) पक्ष आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य आणि आम आदमी पक्ष (आप) सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवत आहेत.
‘महाआघाडी’मध्ये जागावाटपावरून ‘बिघाडी’ झाली असून एकूण २४३ जागांसाठी २५४ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीत राजद सर्वाधिक १४३, तर काँग्रेस ६१ जागा लढवत आहे. सीपीआय (एमएल) २०, सीपीआय ९, सीपीएम ४, व्हीआयपी १५ आणि आयआयपी ३ जागांवर नशीब आजमावत आहे. विखुरलेली महाआघाडी आता ‘डॅमेज कंट्रोल मोड’मध्ये आली आहे. राजदने काँग्रेसशी थेट संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार राम यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला नाही; परंतु अर्धा डझन जागांवर दोघांमध्ये लढाई कायम आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे उमेदवार चार जागांवर आणि व्हीआयपी आणि राजद उमेदवार एका जागेवर परस्परविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रकार तेजस्वी यांना राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो.
राज्याची सत्ता दोन दशकांहून अधिक काळ नितीशकुमार यांच्या हातात आहे. राजदने पुनरागमनासाठी अनेक हालचाली केल्या; परंतु सत्तेत परतणे शक्य झाले नाही. यावेळी तेजस्वी यादव यांनी महाआघाडीची व्याप्ती वाढवली; परंतु जागावाटपावर एकमत न झाल्याने अनेक जागांवर आपापसात लढतीची परिस्थिती निर्माण झाली.
एनडीएमध्येही जागावाटपाचा गुंता होता; पण उमेदवारीबरोबरच सर्व वाद मिटवण्यात नेत्यांना यश आले. त्यामुळे एनडीए ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. महाआघाडीचे उमेदवार एनडीएसोबत सुमारे डझनभर जागांवर त्यांच्या मित्रपक्षांशीही भिडत आहेत. भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडली तर त्याचा थेट फायदा एनडीएला होईल, हे स्पष्ट आहे. मतविभाजन टाळण्यात महाआघाडी यशस्वी होते का, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- प्रदीप जोशी