
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या चर्चांना खतपाणी घातले आहे. आपण याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगत, दोन टर्मच्या घटनात्मक मर्यादेला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यताही त्यांनी फेटाळलेली नाही. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटलेआहे.
अमेरिकेच्या संविधानातील २२ वी घटनादुरुस्ती स्पष्टपणे सांगते की, कोणतीही व्यक्ती दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडली जाऊ शकत नाही. १९५१ मध्ये ही दुरुस्ती लागू करण्यात आली. यापूर्वी, फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून परंपरा मोडली होती. त्यांनी चौथ्यांदाही निवडणूक जिंकली, पण कार्यकाळाच्या सुरुवातीलाच १९४५ मध्ये त्यांचे निधन झाले. एकाच व्यक्तीकडे दीर्घकाळ सत्ता राहू नये आणि सत्तेचे केंद्रीकरण टाळण्याच्या हेतूने, त्यानंतर हा घटनात्मक बदल करण्यात आला.
तांत्रिकदृष्ट्या संविधानात बदल करणे शक्य असले तरी, अमेरिकेच्या इतिहासात ही प्रक्रिया अत्यंत दुर्मीळ आणि जिकिरीची मानली जाते. सध्याच्या तीव्र राजकीय ध्रुवीकरणामुळे ते अधिकच कठीण आहे. कोणत्याही घटनादुरुस्तीसाठी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह' आणि 'सीनेट' या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक असते. इतकेच नाही, तर त्यानंतर ५० पैकी किमान ३८ राज्यांच्या विधानसभांची त्याला मंजुरी मिळणे बंधनकारक असते. ही प्रक्रिया पूर्ण करणे जवळपास अशक्य मानले जाते.
सध्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे हाऊसमध्ये २१९-२१३ असे निसटते बहुमत आहे, तर सीनेटमध्ये ५३-४७ असे बहुमत आहे. पक्ष २८ राज्यांच्या विधानसभांवर नियंत्रण ठेवतो, जे घटनादुरुस्तीसाठी लागणाऱ्या ३८ राज्यांच्या आकड्यापेक्षा खूपच कमी आहेत. असे असले तरी, रिपब्लिकन खासदार अँडी ओगल्स यांनी जानेवारी २०२५ मध्ये २२ वी घटनादुरुस्ती बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. हा बदल यशस्वी झाल्यास ट्रम्प यांना २०२९ मध्ये तिसरा कार्यकाळ मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, या प्रस्तावाला खुद्द रिपब्लिकन पक्षातही पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे.
ट्रम्प यांनी आपण उपराष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो आणि नंतर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिल्यावर सत्ता सांभाळू शकतो, असे विधान गंमतीत केले होते. मात्र, कायदेशीरदृष्ट्या हे अशक्य आहे. संविधानाच्या १२ व्या दुरुस्तीनुसार, जी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनण्यास अपात्र आहे, ती व्यक्ती उपराष्ट्रपतीदेखील बनू शकत नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी हा मार्गही कायदेशीररित्या पूर्णपणे बंद आहे.
- सचिन दळवी