गोव्यातील ड्रग्ज नेटवर्कवर प्रश्नचिन्ह

ड्रग्जसारख्या व्यवसायात दाऊच्या गँगने गोव्यातही हात पाय पसरल्याची शक्यता नाकारता येत नाही. दानिशला अटक झाली एवढ्यावर न थांबता गोवा पोलिसांनी पुढाकार घेऊन दानिशचा गोव्यातील ड्रग्ज व्यवसायात हात आहे की नाही, ते तपासणेही आवश्यक आहे.

Story: संपादकीय |
3 hours ago
गोव्यातील ड्रग्ज नेटवर्कवर प्रश्नचिन्ह

गोव्यातील ड्रग्ज व्यवहार हे राज्याबाहेरील सिंडिकेटस् नियंत्रित करतात, हे यापूर्वीही उघड झाले आहे. पर्यटन राज्य असल्यामुळे तसेच गोव्यात सेकंड होमचा फॉर्म्युला प्रसिद्ध असल्यामुळे गोव्यात येणाऱ्यांना ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मोठे नेटवर्क काम करत असते. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने गोव्यात अनेकदा छापे मारून, देश-विदेशातून गोव्यात येणारे ड्रग्ज जप्त केले आहेत. गोव्यातील पोलिसांच्या हाती फक्त काही किरकोळ ड्रग्ज लागत असले तरी देशातील इतर मोठ्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना एनसीबीने अनेकदा अटक केली आहे. गोव्यातील काही नाईट क्लबचे मालक जे ड्रग्जच्या व्यवहारात गुंतलेले आहेत, त्यांनाही इतर राज्यांतील पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यातील ड्रग्जचे नेटवर्क हे गोवा पोलिसांच्या कल्पनेपलीकडचे आहे. त्यातच इस्रायली, नेपाळी, रशियन, नायझेरियन असे ड्रग्ज विक्रेते दरवर्षी गोव्यात येऊन ड्रग्जचा व्यवसाय चालवतात. 

मुंबईत डोंगरीसारख्या भागात दाऊदचे हस्तक ड्रग्जची फॅक्टरी चालवतात, हे यापूर्वी अनेकदा पोलिसांच्या आणि एनसीबीच्या तपासातून समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज दाऊदच्या हस्तकांकडून यापूर्वी जप्त करून त्यांना अटकही झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांना एका ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना २५० कोटींच्या ड्रग्ज उत्पादन प्रकरणाचा छडा लागला होता. त्या प्रकरणातील मोहम्मद सलिमला चार दिवसांपूर्वीच दुबईतून मायदेशी परत पाठवल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ड्रग्ज व्यवहाराचे कनेक्शन दाऊद गँगशी आहे, हे देशातील वेगवेगळ्या प्रकरणांतून अनेकदा समोर आले. 

मुंबईत ड्रग्जचा व्यवहार पाहणारा मुख्य सूत्रधार दानिश चिकना याला जेव्हा गोव्यातून एनसीबीने अटक केली, तेव्हा गोव्यातीलही ड्रग्ज व्यवसाय दाऊदचीच गँग नियंत्रित करत असावी, असा संशयही बळावला आहे. दानिश ऊर्फ चिकना हा यापूर्वीही एनसीबी आणि इतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. तो तुरुंगातही होता. एका ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव आल्यापासून त्याला एनसीबी शोधत होती. बार्देशमधील हडफडे येथील एका व्हिलामध्ये दानिश राहत होता. त्याला तिथे एनसीबीने अटक केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्याला मुंबईला नेण्यात आले. गोव्यात गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गुंड तसेच दहशतवादीही यापूर्वी राहून गेल्याचे अनेकदा उघड झाले आहे. भटकळ बंधूंपैकी एक दहशतवादी गोव्यातच राहत होता. अलीकडेच बिष्णोई गँगच्या अनेक साथीदारांना गोव्यात अटक करून नेण्यात आले. गोव्यातील मालमत्ता विकत घेण्यासाठी या टोळ्यांचे लोक येत असतात. अनेक मालमत्ता त्यांनी गोव्यात विकतही घेतल्या आहेत. अंडरवर्ल्डशी संबंधित अनेकांनी गोव्यात बेनामी मालमत्ता घेतल्या आहेत. दानिश गोव्यात फक्त राहत नव्हता, तर इथून तो व्यवहारही पाहत होता. अनेक जमीन विक्री प्रकरणांत त्याचे लोक आहेत. गोवा त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरल्यामुळेच गोव्यातील ड्रग्ज व्यवसायही तेच नियंत्रित करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एनसीबीने दानिशकडून गोव्यातील ड्रग्ज व्यवसायाशी असलेले संबंध शोधण्याच्या दृष्टीने चौकशी केली, तर काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

डोंगरी नंतर सांगली - महाराष्ट्र येथेही मेफेड्रोन हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सापडला होता. हे सारे व्यवसाय दाऊदशी संबंधित लोकच चालवतात, हेही स्पष्ट झाले आहे. डोंगरी, सांगली अशा भागांत हे लोक कारखाने चालवू शकतात, तर गोव्यासारख्या भागात जिथे देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात तिथेही त्यांचे नेटवर्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यातून पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीत केटामाईन ड्रग्ज बनवणाऱ्या युनिटचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने पर्दापाश केला होता. या साऱ्या गोष्टी पाहिल्या तर दानिश मर्चंटला फक्त गोव्यातून पकडले असे समजून गप्प न राहता, गोवा पोलिसांनी एनसीबीची मदत घेऊन दानिशचे व्यवहार गोव्यातही चालायचे का, ते शोधण्याची गरज आहे. अनेक मोठमोठ्या गँगच्या लोकांना गोव्यातून दरवेळी अटक झालेली आहे. गोव्यातील कॅसिनोंपासून ते बांधकाम व्यवसायात काळा पैसा कसा फिरतो, तेही ईडी आणि प्राप्तीकर खात्याच्या छाप्यांतून उघड झाले आहे. त्यामुळे ड्रग्जसारख्या व्यवसायात दाऊच्या गँगने गोव्यातही हात पाय पसरल्याची शक्यता नाकारता येत नाही. दानिशला अटक झाली एवढ्यावर न थांबता गोवा पोलिसांनी पुढाकार घेऊन दानिशचा गोव्यातील ड्रग्ज व्यवसायात हात आहे की नाही, ते तपासणेही आवश्यक आहे.