तब्बल २० वर्षे चालला देशाच्या सुरक्षेशी खेळ; 'मृत' भावाला दिल्लीतून अटक

मुंबई: भारतीय सुरक्षा यंत्रणांना हादरवून सोडणाऱ्या एक गुप्तहेर प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. मुंबईत बनावट 'वैज्ञानिक' बनून वास्तव्य करणाऱ्या अलेक्जेंडर पालमर (Alexander Palmer) उर्फ अकबर कुतुबुद्दीन हुसैनी (Akbar Kutubuddin Husaini) याच्या अटकेनंतर आता या 'स्पाय नेटवर्क'चा दुसरा चेहरा समोर आला आहे. गेली २० वर्षे मृत घोषित असलेल्या अकबर हुसैनी याचा भाऊ आदिल हुसैनी याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सीमापुरी, दिल्लीतून अटक केली आहे. या प्रकरणात अनेक परदेशी गुप्तचर यंत्रणांशी जोडलेल्या गुप्तहेरी रॅकेटचे असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.

वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार असल्याचे घेतले सोंग
मुंबई क्राइम ब्रँचने २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केलेला अकबर हुसैनी स्वतःची ओळख 'अलेक्जेंडर पालमर' नावाचा आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि वैज्ञानिक म्हणून करून देत होता. तपासामध्ये तो विदेशी नागरिक असल्याचे आणि त्याने भारतात बोगस पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्डसह अनेक बनावट सरकारी कागदपत्रे बनवून स्वतःला भारतीय नागरिक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील अंधेरी भागातील जूहू-सौर बेटावरील फ्लॅटमध्ये तो पत्नी आणि मुलासह अनेक वर्षांपासून आरामात राहत होता. त्याच्या फ्लॅटमधून बनावट ओळखपत्रे, परदेशी प्रवासाची कागदपत्रे आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

'मृत' भाऊ निघाला गुप्तहेर नेटवर्कचा साथीदार
या प्रकरणात समोर आलेली सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे अकबर हुसैनीने ज्याला मृत घोषित केले होते, तो त्याचा भाऊ आदिल हुसैनी जिवंत असल्याचे उघड झाले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तातडीने कारवाई करत आदिल हुसैनी याला अटक केली. आदिलवर गंभीर आरोप आहेत. त्याने आपला भाऊ अकबर याच्या सहकार्याने अनेक बनावट भारतीय पासपोर्ट मिळवले आणि परदेशी गुतहेर संस्थांना संवेदनशील माहिती पुरवली.

राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका
दोन्ही भावांनी एकाच 'बनावट पत्त्याचा' वापर करून अनेक पासपोर्ट मिळवले आहेत. त्यांच्याकडून बनावट दस्तऐवज आणि पासपोर्टच्या प्रती जप्त करण्यात आल्या आहेत. आदिल परदेशात अनेकवेळा प्रवास करून संवेदनशील माहिती पुरवत असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
अकबर हुसैनीच्या (अलेक्जेंडर पालमर) मोबाईल फोनमधून पोलिसांनी डेटा काढला असून, त्यामध्ये अत्यंत आक्षेपार्ह फोटो (Highly objectionable photographs) सापडले आहेत. या फोटोचे स्वरूप पोलिसांनी उघड केले नसले तरी, हे ब्लॅकमेलिंग किंवा अन्य अवैध कृत्यांशी संबंधित असू शकते. याव्यतिरिक्त, त्याच्याकडून १४ नकाशे आणि अण्वस्त्रांशी (Nuclear Bomb) संबंधित गंभीर माहिती जप्त करण्यात आली होती.

या प्रकरणी इंटेलिजन्स ब्युरो (IB), RAW, मिलिटरी इंटेलिजन्स (MI), दिल्ली पोलीस स्पेशल सेल, मुंबई क्राइम ब्रँच आणि झारखंड पोलीस यांसारख्या देशातील अनेक प्रमुख तपास यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ भारतीय गुप्तचर यंत्रणांना गुंगारा देणारे हे जासूसी नेटवर्क राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर प्रकरण बनले आहे.