वाहतूक संचालनालयाचा आदेश

पणजी : गोव्यात सार्वजिनक सेवेत असलेल्या वाहनांना ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत वाहन ‘लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम’ व आपत्कालीन बटन (Vehicle location tracking system) बसवावे, अशी सूचना वाहतूक संचालनालयाने (Directorate of Transport) जारी केली आहे.
वाहतूक संचालक पी. प्रवीमल अभिषेक यांनी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसीत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. रस्ता वाहतूक व हमरस्ता मंत्रालयाने मोटर वाहन कायदा १९८८ (Motor Vehicle Act 1988) मध्ये वाहनांना वाहन ‘लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम’ व आपत्कालीन बटन बसवण्यासंदर्भात समावेश केला होता. १ एप्रिल, २०१८ ही नवी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक सेवेत असलेल्या वाहनांना हा नियम सक्तीचा करण्यात आला होता. वाहन निर्मिती कंपन्या, वाहन विक्रेते किंवा वाहन मालकांनी वाहन ‘लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम व आपत्कालीन बटन बसवण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, वाहतूक खात्याने केलेल्या पाहणीत ‘लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम’ व आपत्कालीन बटन एक तर बसवण्यात आलेले नाही किंवा बसवलेले असल्यास ते चालत दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवेत असलेल्या वाहन मालकांना व जनतेला ही कळावे म्हणून संबंधित अधिकारिणीच्या संमतीने हा आदेश जारी करण्यात आला. त्यात ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सार्वजनिक सेवेत असलेल्या वाहनांना वाहन ‘लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम’ व आपत्कालीन बटन बसवावे, असा आदेश सार्वजनिक नोटीसीतून जारी केला आहे.