आमदार रेजीनाल्ड घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

पणजी : सततच्या पावसामुळे भातशेतीत (Agriculture) पाणी तुंबून राहण्याबरोबर सुपारीही गळण्यास सुरवात झाली आहे. कापणी केलेल्या शेंडांना कोंब फुटण्यास सुरवात झाली आहे. ऊनाची गरज असताना पावसाने (Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडातला घास हिरावला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करणार असल्याचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
दिवाळी पूर्वीच बिगरमोसमी पावसाला सुरवात झाली. गेल्या शुक्रवार, शनिवारी पावसाचे प्रमाण अधिक होते. यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने; थोडाफार दिलासा मिळाला होता. तोच मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. बुधवारी सकाळी सर्वत्र जोरदार वृष्टी झाली.
बहुतांशी भातशेतीची कापणी झालेली आहे. पावसामुळे भाताची कणसे भिजून ती कुजण्यास सुरवात झाली आहे. कमी, अधिक प्रमाणात सर्वच भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी आधारभूत निधी अंतर्गत हेक्टरी ४० हजार प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच नुकसानीचे प्रमाण कळणार आहे, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
४ रूपयांऐवजी ६ रूपये चौ.मी.
प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी
सध्या ४ रूपये प्रती चौरस मीटर (हेक्टरी ४० हजार) प्रमाणे नुकसान भरपाई देते. हे प्रमाण फारच कमी आहे. नुकसान भरपाईच्या रक्कमेत ६ रूपये प्रती चौरस मीटर एवढी वाढ करण्याची मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली. कुडतरी मतदारसंघात शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे, असे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
पावसामुळे सुपारीलाही फटका
यंदा पावसाचे प्रमाण उत्तम होते. यामुळे सुपारीचे पिक समाधानकारक होते. परंतु आता पावसामुळे सुपारी गळण्यास सुरवात झाली आहे. ऊनाची आवश्यकता असताना सततच्या पावसामुळे सुपारीचे मोठे नुकसान होत आहे, अशी माहिती सत्तरीतील प्रगतीशील बागायतदार अशोक जोशी यांनी दिली. ज्या बागायतदारांनी किटकनाशकाची फवारणी केलेली नाही, त्यांना तर मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे ते म्हणाले.