राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी : एसआयआर संदर्भात बैठक

पणजी : मतदारांविषयी (voters) चुकीची माहिती देणाऱ्या बीएलओंवर (BLO) कारवाई करावी, अशी मागणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी मतदार यादीच्या पडताळणीबाबत (SIR) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. बैठकीदरम्यान ही मागणी करण्यात आली.
मतदार यादीच्या पडताळणीची प्रक्रिया ४ नोव्हेंबरला सुरू होईल आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, भाजपचे पुंडलिक राऊत देसाई, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत बैठकीला उपस्थित होते.
निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदार यादीच्या पडताळणी प्रक्रियेची माहिती दिली. ९ डिसेंबरला मतदार यादीचा मसुदा जाहीर होईल, तर ८ जानेवारी २०२६ पर्यंत सूचना तसेच हरकतींसाठी हा मसुदा खुला असेल.
बीएलओंवर लक्ष ठेवा : अमित पाटकर
बैठकीनंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, मतदारांनी जागरूक राहुन सूचना किंवा हरकतींची नोंद करावी. यापूर्वी बीएलओंकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत, त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.
मृत मतदारांना वगळा : राऊत देसाई
भाजपचे प्रतिनिधी पुंडलिक राऊत देसाई यांनी सांगितले की, २००२ नंतर, म्हणजे २३ वर्षांनी मतदार यादीची कठोर पडताळणी होत आहे. ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली पाहिजेत. काही लोक बाहेरून येऊन गोव्यात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या नावांचा समावेश करताना, त्यांची नावे त्यांच्या मूळ राज्यातील यादीत नाहीत याची खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घेणार आढावा
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीच्या कामासंबंधी झाल्या आहेत की नाही, याची तपासणी केली जाईल. जर निवडणुकीच्या कामाशी संबंध असेल, तर सरकारला बदली आदेशाचा फेरविचार करण्यास सांगितले जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी बैठकीनंतर सांगितले.
बदल्यांविषयी आयोगाकडे तक्रार करा
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली की, मतदार यादीच्या पडताळणीमुळे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. अमित पाटकर यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल भाजपने निवडणूक आयोगाकडे सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी तक्रार केली आहे, त्याचप्रमाणे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक यांनी गोवा सरकारने केलेल्या बदल्यांविषयी निवडणूक आयोगाकडे तशीच तक्रार करावी.
बीएलओंना देणार प्रशिक्षण
मतदार यादीच्या पडताळणी विषयी बीएलओंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. राजकीय पक्षांनीही बूथ पातळीवर एजंटची नियुक्ती करावी, अशी सूचना केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.