
पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या ६० दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या रजेमुळे निर्माण झालेल्या पदांची (लिव्ह व्हेकंन्सी) (Leave Vacancy) भरती यापुढे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फतच भरण्यात येणार आहेत. याबाबत कार्मिक खात्याने (Personnel Department) सर्व खाती, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांना (Autonomus organization) आदेश जारी केला आहे. अशा जागांवर महामंडळ वगळता बाहेरील अन्य कंत्राटी कर्मचारी नेमू नयेत असे आदेशात स्पष्ट केले आहे.
आदेशानुसार, नियमित कर्मचाऱ्यांच्या विनावेतन रजा, प्रसूती, अभ्यास रजा, बालसंगोपन, अर्जित रजा, एक्स्ट्राऑर्डिनरी रजा किंवा इतर प्रकारच्या साठ दिवसांपेक्षा अधिक रजांच्या कालावधीत क्लेरिकल जागांसाठी केवळ मनुष्यबळ विकास महामंडळाकडून कर्मचारी आऊटसोर्स करण्यात येणार आहेत. यामध्ये एमटीएस, चालक, कनिष्ठ कार्यालयीन सहायक, एलडीसी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, खाजगी सहायक, स्टेनो या पदांचा समावेश करण्यात आला आहे.
याआधी कार्मिक खात्याने महामंडळाकडून अन्य सरकारी खात्यात तैनात करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची नियुक्ती अचानकपणे रद्द करू नये असे आदेश जारी केले होते. महामंडळातून सरकारी खात्यात तैनात असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापूर्वी महामंडळाला त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करता यावी यासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना आगाऊ माहिती द्यावी असेही त्या आदेशात म्हटले होते.