रेती व्यवसायावरून उगवेत गोळीबार

दोन युवक गंभीर जखमी; वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
रेती व्यवसायावरून उगवेत गोळीबार

पेडणे : उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील जैतीर, उगवे परिसरात साेमवारी रात्री उशिरा रेती व्यवसायाच्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. आर. पास्वान आणि लाल बहादूर जी. (३७ वर्षे, दोघेही रा. बिहार) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील एका युवकाच्या मानेतून, तर दुसऱ्याच्या हातातून गोळी आरपार गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जखमी झालेल्या दोघांना तत्काळ पेडणे येथील एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर म्हापसा जिल्हा रुग्णालयात आणि अखेरीस बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही युवक मूळचे बिहारचे असून, पोरस्कडे येथे वास्तव्यास होते.
बेकायदेशीर रेती व्यवसायातून होणारे वादविवाद, तणाव आणि भांडणे राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामुळे असंतोष पसरत आहे. भांडणांचे पर्यावसन आता गोळीबार करून जीव घेण्यासारख्या घटनांमध्ये होत असल्याने या रेती व्यवसायातील स्पर्धा रोखण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये, कुडचडे येथील बाणसाय येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबारात युसूफ आलम (२३ वर्षे) नावाच्या झारखंड येथील युवकाने जीव गमावला होता, तर आणखी एक युवक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
या गंभीर घटनेनंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. राज्यात भांडणांचे पर्यावसन थेट गोळीबारासारख्या गंभीर घटनांमध्ये होत असल्यामुळे भविष्यात गुन्हेगारी टोळ्या (गँग) तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
उगवे येथील गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांना तत्काळ अटक करून कोठडीत टाकले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधकांकडून कायदा-सुव्यवस्थेवर टीका

राज्यात भांडणांचे पर्यावसान गोळीबारासारख्या गंभीर घटनांमध्ये होत असल्यामुळे गुन्हेगारी टोळ्या (गँग) निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा धाक (भय) उरलेला नाही, त्यामुळे भाजप सरकारच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा