
जोयडा : कारवार- गोवा सीमेवरील (Karwar-Goa Border) माजाळी तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान खासगी बसमध्ये पोलिसांना तब्बल १ कोटींची अवैध रोकड (1 Crore illegal cash) सापडली आहे. ही रोकड गोव्यातून बेंगळुरूकडे (Goa to Banglore) नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही घटना मध्यरात्री घडली. नियमित तपासणीदरम्यान पोलिसांनी (Police) बसमधील प्रवाशांच्या बॅगा तपासल्या असता, राजस्थान येथील कल्पेश कुमार नावाच्या प्रवाशाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. त्याच्यासोबत भामृकुमार नावाची आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती, असे पोलिसांनी सांगितले.
जप्त केलेली रोकड उच्च मूल्याच्या नोटांमध्ये असून, तिचा मालक आणि स्त्रोत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याप्रकरणी चित्तकुल ( सदाशिवगड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत या रकमेचा संबंध बेकायदेशीर व्यवहार, हवाला नेटवर्क किंवा राजकीय निधीशी असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या कारवाईनंतर सीमावर्ती भागात पोलिसांनी आंतरराज्य मार्गांवर तपासणी अधिक कडक केली आहे. ही रोकड कुठून आली आणि कुठे जाणार होती याचा तपास पोलीस करीत आहेत.