
पणजी: नावेली येथे २२ ऑक्टोबर रोजी एडबर्ग परेरा याला पोलीस चौकीत मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलीस खात्याने एका उपनिरीक्षकाला निलंबित केले. परंतु, प्रत्यक्षात ज्यांच्या उपस्थितीत ही घटना घडली, त्या सर्व पोलिसांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली आहे. बुधवारी त्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) जाऊन परेरा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धेश भगत उपस्थित होते.
पालेकर यांनी सांगितले की, गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गोळीबाराची प्रकरणे होत असताना आता पोलीसही गुंडांप्रमाणे वागताना दिसत आहेत. एडबर्गच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, नावेली येथील घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याला पोलीस स्थानकात नेऊन कुटुंबीयांसमोरच मारहाण केली. यावेळी त्याच्या पायात बेड्या घातल्या होत्या, असेही कुटुंबीयांनी सांगितले. या मारहाणीत एडबर्गच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू असले तरी, त्याची प्रकृती अजूनही स्थिर नाही.
ते म्हणाले, याप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टीकम सिंह वर्मा पत्रकार परिषद घेतली. यात एडबर्ग पडल्याने त्याला मार लागल्याचे सांगितले. मात्र, एखादी व्यक्ती पडल्यावर एवढी जबर दुखापत होऊ शकत नाही. एका पोलीस उप निरीक्षकाला निलंबित करायला एवढा वेळ का लागला, पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले का, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही बेड्या का घालण्यात आल्या? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी देणे आवश्यक आहे. आज देखील कुटुंबीयांकडून पोलिसांना हवी असणारी जबानी (स्टेटमेंट) घेण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप पालेकर यांनी केला.