कुटुंबीयांकडून मात्र मारहाणीचे आरोप कायम

मडगाव: नावेली येथील एडबर्ग परेरा याला २२ ऑक्टोबर रोजी पोलीस चौकीत मारहाण झाली होती. प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मद्यपान करून दंगा करणाऱ्या एडबर्गला पोलीस चौकीत आणले होते, जिथे दंगा करत असताना पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा तोल जाऊन त्याला दुखापत झाली, अशी माहिती वर्मा यांनी दिली आहे. या प्रकरणात प्राथमिक तपासात दोषी आढळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले असून, त्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक वर्मा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एडबर्ग परेरा याला दंगा करत असताना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर आणि मडगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही तो सतत दंगा व गोंधळ करत होता आणि त्याने पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दंगा रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला व त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल केले.
एडबर्गच्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या मेंदूच्या भागात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरवईकर प्राथमिक तपासात दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे. बेड्या घालण्यात आल्याच्या आरोपांवरही तपास सुरू असून, सध्या एडबर्गवर उपचार सुरू असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची वाट पाहिली जात असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.
कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप
दरम्यान, एडबर्गच्या कुटुंबीयांनी पोलिसांचा दावा फेटाळला आहे. एडबर्गच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, पोलिसांनी एडबर्गला साखळीने बांधून मारहाण केली. मारहाणीनंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता आणि त्याला गाडीतही व्यवस्थित घालण्यात आले नाही. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.