
पणजी : गोव्यातील प्रसिद्ध बासरी आणि संतूर ( Flute and Santoor ) वादक नरेश मडगावकर (५१ वर्षे) (Naresh Madgaonkar) यांचे मडगाव (Margao) येथे एका कार्यक्रमादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने गोव्यातील संगीत, कला क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले आहे.
गोव्यातील (Goa) एक नामांकित बासरी व संतूर वादक म्हणून ओळखले जात होते. संतूरमध्ये विशेष पदवी असलेले ते मुंबईतील पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे शिष्य होते. वयाच्या ८ व्या वर्षी म्हापसा येथील स्वर शृंगार संगीत अकादमीमध्ये पंडित राजेंद्र सिंगबाळ यांच्याकडून हार्मोनियमवर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवण्याची कला आत्मसात करण्यास सुरूवात केली. प्रसिद्ध वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे वादन ऐकून त्यांना संतूरबद्धलचे आकर्षण निर्माण झाले. गोव्यात त्यावेळी संतूर शिकवणारे शिक्षक नव्हते. मात्र, नरेश मडगावकर यांची शिकण्याची इच्छा तीव्र होती. गोव्यातील कला अकादमीमध्ये उच्च संगीत शिक्षण घेतले. त्याच वेळी बेळगाव येथील डॉ. सुधांशू कुलकर्णी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. अर्थशास्त्राची पदवीही घेतली. डॉ. धनंजय दैत्यंकर (पुणे) यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. गेल्या २७ वर्षांत भाऊ सतीश मडगावकर (तबला) यांच्यासोबत अनेक ठिकाणी कार्यक्रम केले.
संतूरमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणारे पहिले गोवेकर
संतूरमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणारे पहिले गोवेकर होते. राजभवन-गोवा येथे तत्कालीन भारताचे पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर केला होता. दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम सादर केले. त्याचबरोबर "अॅटमॉस्फीअर" या जागतिक संगीत अल्बमसाठी सादरीकरण केले व अनेक कोकणी चित्रपटांसाठी संगीत दिले.
दरम्यान, आज बुधवारी १२.३० वाजता पालये, उसकई येथे दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, १३ वर्षीय मुलगी (संतूर वादक), आई, चार भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.