गँगस्टर दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला एनसीबीद्वारे गोव्यातून अटक

हडफडे येथील एका व्हिलामधून आवळल्या मुसक्या.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गँगस्टर दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला एनसीबीद्वारे गोव्यातून अटक

पणजी : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या अंमली पदार्थ नेटवर्कवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे! दाऊदचा अत्यंत विश्वासू आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार दानिश चिकना उर्फ दानिश मर्चंट उर्फ फँटम  याला 'एनसीबी'च्या मुंबई पथकाने गोव्यातील हडफडे (Arpora) येथून अटक केली आहे.

ही कारवाई 'एनसीबी'ने रविवारी मध्यरात्री केलेल्या गुप्त मोहिमेदरम्यान करण्यात आली. अटक झाली तेव्हा दानिश चिकनासोबत एक महिला देखील होती, यामुळे अटक प्रक्रियेदरम्यान हणजुण पोलीस स्थानकाच्या महिला पथकाची मदत घेण्यात आली होती.

डोंगरीतील 'ड्रग्ज फॅक्टरी'चा ऑपरेटर

दानिश मर्चंट आणि त्याच्या साथीदारांवर मुंबईतील डोंगरी परिसरात दाऊद इब्राहिमसाठी ड्रग्ज फॅक्टरी चालवण्याचा गंभीर आरोप आहे. दानिश हा दाऊदच्या नेटवर्कअंतर्गत ड्रग्जचे उत्पादन, वितरण आणि व्यवस्थापन करणारा मुख्य 'ऑपरेटर' म्हणून ओळखला जातो. अंडरवर्ल्ड जगतात तो एमडी ड्रग्जचा मुख्य पुरवठादार म्हणूनही कुख्यात आहे. जामिनावर सुटल्यानंतरही दानिश गुप्तपणे आपला अवैध धंदा नव्या नेटवर्कच्या मदतीने चालवत होता, पण 'एनसीबी'च्या रडारवरून तो सुटू शकला नाही.

मागील वर्षापासून पोलीस होते मागावर

दानिश चिकना ड्रग्ज प्रकरणात अटक होण्याची ही पहिली वेळ नाही. त्याला यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये मोहम्मद आशिकुर सहिदुर रहमान आणि रेहान शकील अन्सारी यांच्या अटकेतून दानिशचे कनेक्शन उघडकीस आले होते. २०११ मध्ये दाऊदशी संबंधित एका वेगळ्या ड्रग्ज फॅक्टरी ऑपरेशनच्या संदर्भातही त्याला राजस्थानहून मुंबईत आणण्यात आले होते.

गेल्या वर्षी अटक झालेल्या एका प्रकरणात अटक झालेल्या संशयितांकडून एकूण १९९ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या साठ्याच्या पुरवठ्यासाठी दानिश चिकनाच जबाबदार होता.

 'डी कंपनी'च्या २५६ कोटींच्या ड्रग्स रॅकेटवर 'क्राईम ब्रांच'चा हातोडा

दरम्यान, मुंबई क्राइम ब्रँचने दाऊदच्या नेटवर्कशी जोडलेल्या तब्बल २५६ कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला . दुबईतून नुकत्याच प्रत्यार्पित (Deported) करण्यात आलेल्या सलीम डोलाचा निकटवर्ती मोहम्मद सलीम सुहेल शेख याला अटक करून क्राइम ब्रँचने हे मोठे यश मिळवले.

 'ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सांगली येथे 'मेफेड्रोन' (Mephedrone - MD) तयार करणारा गुप्त कारखाना आढळला. २५ मार्च २०२४ रोजी टाकलेल्या छाप्यात १२२.५ किलोग्रॅम 'एमडी' (बाजारमूल्य २४५ कोटी रुपये) जप्त करण्यात आले. दुबईस्थित तस्कर सलीम डोला भारतात बसून या अंमली पदार्थाच्या नेटवर्कचे संचालन करत होता, तर सलीम शेख हा दुबईस्थित फायनान्सर्स आणि महाराष्ट्र-गुजरात येथील वितरकांमध्ये समन्वयक म्हणून काम करत होता. या संपूर्ण ऑपरेशनमधून आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १२६ किलोग्रॅम 'मेफेड्रोन' (आंतरराष्ट्रीय बाजारात २५२ कोटींहून अधिक किंमत) आणि ४.१९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

दाऊदच्या या ड्रग्ज नेटवर्कवर 'एनसीबी' आणि मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटची अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दानिश चिकनाला ट्रांझिट रिमांडसाठी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी मुंबईत नेण्यात आले आहे.