१ लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज : अग्निशामक दलाने वाचवली मालमत्ता

वाळपई : मोर्ले येथील केसरकरवाडा भागात मंगळवारी रात्री शशिकांत केसरकर यांच्या घराला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते यशस्वी ठरले नाहीत. अखेर वाळपई अग्निशामक दलाला कळविण्यात आले. दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
आगीत घराचे छप्पर आणि आतील साधनसामग्री जळून खाक झाली असून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी तत्काळ या कुटुंबाशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, सदर घराच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार असून कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आगीत केसरकर कुटुंबासमोर अडचणी निर्माण झाल्या असून स्थानिक नागरिकांनी त्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.