कर्नाटकातील पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

पर्यटनासाठी मित्रांसह आला होता गोव्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
कर्नाटकातील पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

पैंगीण : कर्नाटकातील धारवाड येथील रहिवासी अनुप तुपसुंदर (३४) यांचा सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुट्टीसाठी गोव्यात आलेल्या अनुप यांना तब्येतीत अचानक बिघाड झाल्यानंतर काणकोण सामुदायिक आरोग्य केंद्रातून उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मडगाव येथे हलविण्यात आले होते. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप तुपसुंदर हे २४ ऑक्टोबर रोजी चुलत भाऊ नीतेश तुपसुंदर आणि मित्र अक्षय सागर यांच्यासह सुट्टीसाठी पाळोळे येथे आले होते. २७ ऑक्टोबर रोजी तिघे मूळ गावी परतण्यासाठी काणकोण येथील चार रास्ता परिसरात बसची वाट पाहत असताना, अनुप यांना अचानक चक्कर आली. त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि काही क्षणांतच ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले.

तत्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना काणकोण सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अनुप यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला.

शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांनी अंतिम संस्कारासाठी तो धारवाडला नेला.

या प्रकरणी काणकोण पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. उपनिरीक्षक बाबू देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.