हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक : संशयिताचा शोध सुरू

बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देताना पीडित महिला. (लुईस रॉड्रिग्स)
बेळगाव : बेळगाव आणि खानापूर तसेच गोव्याच्या सीमावर्ती भागातील हजारो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा अगरबत्ती घोटाळा उघडकीस आला आहे. ‘घरबसल्या काम’ देण्याच्या नावाखाली महिलांना रोजगाराचे आमिष दाखवून हा मोठा फसवणुकीचा प्रकार रचण्यात आला होता.
स्वतःला अजय पाटील असे भासविणारा मुख्य सूत्रधार प्रत्यक्षात बाबासाहेब कोळेकर असून तो सोलापूर (महाराष्ट्र) येथील रहिवासी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार या संशयिताने सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
महिलांना अगरबत्ती पॅकिंगच्या व्यवसायाचे आमिष दाखवण्यात आले. घरबसल्या काम करून दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल, असे सांगून त्यांना आकर्षित करण्यात आले. मात्र या कामासाठी प्रत्येक महिलेकडून २,५०० ते ५,००० रु. अशी ‘वर्क आयडी फी’ आकारली जात होती. याशिवाय, इतर महिलांना जोडल्यास अधिक कमाई मिळेल, अशा चेन मार्केटिंगच्या जाळ्यात त्यांना अडकवण्यात आले.
सुरुवातीला ही योजना अतिशय व्यवस्थित व विश्वासार्ह वाटत होती. कोळेकरने बेळगावात कार्यालय आणि निवासस्थान भाड्याने घेतले होते. स्थानिक ऑटो रिक्षाचालकांमार्फत अगरबत्ती पॅकेट्स महिलांच्या घरी पोचवून पॅकिंगचे काम दिले जात होते. मात्र काही दिवसांतच पेमेंट थांबले आणि अचानक कोळेकरचे कार्यालय बंद व रिकामे आढळले.
या प्रकरणानंतर शेकडो महिला, विशेषतः स्वयं-सहायता बचत गटांतील सदस्य, पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी धावल्या आहेत. पीडित महिला लक्ष्मी कांबळे म्हणाल्या, माझ्या पतीचे नुकतेच निधन झाले. मुलांना सांभाळण्यासाठी या योजनेत सामील झाले. ५,००० रु. गुंतवले, पण आता सर्व काही गेले. पोलिसांनी आरोपीला पकडून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत. स्थानिक रिक्षाचालक गोविंद लामाणी यांनी सांगितले, त्याने सहा-सात ऑटो भाड्याने घेऊन अगरबत्त्या पोचवल्या. माझ्या पत्नीचे २०,००० रु. गेले आणि माझ्या वाहनाचे भाडेही त्याने दिले नाही.
बनावट योजनांपासून सावध रहा : बोरसे
बेळगाव पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले की, या प्रकरणाची नोंद शाहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा घरबसल्या कामाच्या बनावट योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या घटनेने महिलांच्या सबलीकरणाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या फसव्या ‘चेन मार्केटिंग’ योजनांचा धोकादायक विस्तार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद योजनेबाबत त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

संशयित बाबासाहेब कोळेकर