दरोडेखोरांच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गणेशपुरी म्हापसा येथील दरोडा प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
दरोडेखोरांच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाही संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

संशयित आरोपी संतोष बाबू बी. (२७, रा. इब्बलुरू बंगळूरू) व सफिकुल रोहुल अमीर (३७, रा. इब्बलुरू बंगळुरू) या दोघाही मूळ बांगलादेशी नागरिकांना म्हापसा पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

मंगळवार, २८ रोजी संशयितांची पोलीस कोठडीतील मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत संशयितांची रवानगी करण्यात आली.

दरम्यान, दि. ७ ऑक्टोबर रोजी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर हा सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी घाणेकर कुटुंबियांना धमकावून व बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला होता.

सहा जणांच्या मुख्य दरोडेखोर टोळीला बांगलादेशमध्ये सुखरूप पळून जाण्यास वरील संशयितांनी मदत केली होती. अटक केलेले दोघेही संशयित आरोपी हे दरोडेखोर टोळीतील चोरांचे नातेवाईक असून माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत घटनेच्या आठवड्याभरानंतर त्यांना अटक केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ३३१(३), ११५(२), ३५१(३), १२६(२), ३१०(२), ६१(२), १११ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.

दरोडेखोरांच्या साथीदारांच्या शोधासाठी गोवा पोलिसांची पथके राज्याबाहेर

दरोडेखोर टोळीच्या संपर्कात असलेल्या इतर साथीदारांची चौकशी करणे, तसेच आवश्यक भासल्यास त्यातील काहींना अटक करण्यासाठी गोवा पोलिसांची काही पथके राज्याबाहेर पाठवण्यात आली आहेत. ही पोलीस पथके पश्चिम बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, बिजापूर व मुंबईमध्ये दरेडेखोरांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.