कॅमेरूनचा 'ड्रग्ज सप्लायर' अखेर अटकेत.

म्हापसा: गोवा पोलिसांच्या हणजुण पोलिसांनी आणि क्राईम ब्रँचने संयुक्त कारवाई करत ओशेल, बामणवाडो (शिवोली) परिसरातून ज्यूड बौसारी (वय ४४) या कॅमेरून नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक केली आहे. ज्यूड हा यापूर्वीच्या एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात क्राइम ब्रँचला हवा होता.
नेमके प्रकरण काय ?
यासंदर्भात हणजूण पोलीस (Anjuna Police) स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश हरिजन यांनी एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, २९ ऑक्टोबर रोजी बार्देश येथील बामणवाडो, ओशेल शिवोली एका व्हिलाजवळ निळ्या रंगाच्या स्कूटरने (जीए-०३-बीडी-११६४) जात असलेल्या संशयिताला पोलिसांनी थांबवले. झडतीवेळी त्याच्याकडे कोकेन व रोख रक्कम सापडली. तपासणीत १ लाख, १० हजार रुपये किंमतीचे १०.५३ ग्रॅम कोकेन व ६ लाख, ८१ हजार, ८०० रुपयांचे विविध प्रकारचे चलन सापडले. जप्त केलेले ड्रग्ज व रोख रक्कम पंचनामा करून हस्तगत करण्यात आली. त्याच्या अटकेबाबत कॅमेरून दूतावासाला कळविण्याचे निर्देश एफआरआरओला देण्यात आले आहे.
ज्यूड बौसारी याच्या अटकेमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यापूर्वीच १८ जुलै २०२५ रोजी क्राइम ब्रँच पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्याखाली (NDPS Act) एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. नामबोंग फ्रेड कार्ल (वय २१) या दुसऱ्या कॅमेरून नागरिकाला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी क्राइम ब्रँच ज्यूडचा शोध घेत होती. फ्रेड कार्ल प्रकरण व्यावसायिक प्रमाणातील (Commercial Quantity) होते. गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली तेव्हापासून ज्यूड फरार होता. त्याच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर (LOC) देखील जारी करण्यात आले होते. हणजुण पोलिसांनी उपनिरीक्षक रमेश हरिजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला असून, ज्यूडला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.