वास्कोतील महामार्गावर मद्यधुंद विद्यार्थ्याचा व्हिडियो व्हायरल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th October, 11:27 pm
वास्कोतील महामार्गावर मद्यधुंद विद्यार्थ्याचा व्हिडियो व्हायरल

वास्को : सांकवाळ ते दाबोळी महामार्गावर मंगळवारी रात्री एक विद्यार्थी मद्यधुंद स्थितीत रस्त्याकडेला पडला होता. तेथून पायी चालत जाणाऱ्या इतर तीन विद्यार्थ्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थ्यांना तेथील एक स्थानिक तुम्ही कोणत्या संस्थेचे विद्यार्थी आहात? वगैरे प्रश्न विचारताना तारीख व वेळ सांगतो, अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो विद्यार्थी व त्याची संस्था चर्चेत आली.

एक विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत महामार्गाच्या दुभाजकाजवळ पडला आहे. तेथून पायी जाणारे इतर तीन विद्यार्थी त्याला ओळखतात आणि उठविण्याचा प्रयत्न करतात. तो उठून उभा राहतो. परंतु त्याचा सतत तोल जातो. त्याचवेळी एक स्थानिक व्यक्ती त्यांच्याकडे विचारपूस करते. त्याला नीट सांभाळा नाही तर तो वाहनाखाली येईल असे ती व्यक्ती सांगते. त्या मद्यधुंद विद्यार्थ्याला संस्थेत नेण्याचा प्रयत्न ते तीन विद्यार्थी करतात. तथापि, ती व्यक्ती त्यांना तेथेच थांबा म्हणून सांगते. तो मद्यधुंद विद्यार्थी चालण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाखाली चिरडण्याची शक्यता ती व्यक्ती व्यक्त करते. अशाप्रकारचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाली. त्या व्हिडिओत ती व्यक्ती तुम्ही अमूक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आहात काय? असा प्रश्न विचारते. त्यामुळे ते विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक संस्थेतील आहे याचा उलगडा होतो.

तो मद्यधुंद विद्यार्थी दारू पिण्यासाठी कोठे गेला होता, ते स्पष्ट झाले नाही. तथापि, मध्यंतरी झुआरीनगरच्या काही बारसंबंधी चर्चा सुरू होती.

तो विद्यार्थी बिट्स पिलानी​चाच!

- व्हायरल व्हिडिओतील विद्यार्थी बिट्स पिलानीचा असल्याचे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानीच्या जनसंपर्क विभागाचे मुख्य व्यवस्थापक अर्जुन हळर्णकर यांनी मान्य केले आहे.

- या विद्यार्थ्याची वैद्यकीय काळजी घेतली जात आहे. बिट्स पिलानीच्या शिस्तपालन प्रक्रियेनुसार त्याला या वर्तनाबाबत बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

- विद्यार्थ्यांना कामकाजाच्या आणि सुट्टीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून कॅम्पसबाहेर जाण्याची परवानगी आहे. मात्र, रात्री १०.३० वाजेपर्यंत परत येणे आवश्यक आहे.

- कॅम्पसच्या नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तपालन प्रक्रियेनुसार योग्य ती शिक्षा होऊ शकते, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.