पोरस्कडे-उगवे गोळीबारप्रकरणी ४९ मजुरांची पोलिसांकडून चौकशी

मुख्य संशयित अद्याप मोकाट : बंदुकधाऱ्यांची घेतली झाडाझडती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th October, 11:11 pm
पोरस्कडे-उगवे गोळीबारप्रकरणी ४९ मजुरांची पोलिसांकडून चौकशी

पेडणे : पोरस्कडे न्हायबाग–तेरेखोल नदी परिसरात रेती व्यवसायातून दोन मजुरांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या हल्ल्यात गोळीबारात दोन बिहारी मजूर रामरिशी रामराज पासवान आणि लाल बहादूर गौंड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मात्र, ४८ तास उलटूनही या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, पेडणे पोलिसांनी बंदुका वापणाऱ्या स्थानिकांसह ४९ परप्रांतीय कामगारांची चौकशी केली.

२८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आठ जणांचा एक गट तेरेखोल नदीतून रेती काढण्यासाठी उगवे मार्गे पोरस्कडे जात असताना दुसऱ्या गटाने त्यांच्यावर गोळीबार केला. प्राथमिक तपासानुसार हा हल्ला रेती व्यवसायातील स्थानिक स्पर्धेतून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२७ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील परिसरात अनेक रेती व्यावसायिक एकत्र जमले होते. तिथे झालेल्या वादातूनच पुढील दिवशी हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

या घटनेनंतर पेडणे पोलिसांनी स्थानिक मजूर आणि रेती व्यावसायिकांची चौकशी केली आहे. चौकशीतून काही धागेदोरे मिळतील, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी सांगितले की, या प्रकरणात जे कोणी संशयित असतील त्यांना लवकरच पकडण्यात येईल. तपास वेगाने सुरू असून सर्व पुरावे व माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे.

या हल्ल्यात गोळीबार झाल्याने आता पोरस्कडे, न्हायबाग, वारखंड, मोपा, उगवे आणि तोरसे परिसरातील ज्या व्यक्तींना शासकीय परवाना असलेली बंदूक आहे, त्यांना पेडणे पोलीस स्टेशनवर हजेरी लावण्यास सांगण्यात आले होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केली.

मुख्य सूत्रधाराला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

घटनेनंतर दोन दिवस उलटून गेले तरी मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. पोलिसांना या प्रकरणात मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. नागरिकांकडून ‘मुख्य सूत्रधार अजूनही सापडला का नाही?’ असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल आणि या हल्ल्याच्या मूळ कारणाचा उलगडा केला जाईल, असे सांगितले. 

हेही वाचा