संशयितावर गोव्यातही गुन्हे दाखल : ड्रग्जसह खून, खुनाच्या प्रयत्नाचेही गुन्हे

बेळगाव : शहर पोलिसांनी मादक पदार्थ आणि संबंधित पदार्थांच्या अवैध वाहतुकीच्या प्रतिबंधक कायदा, १९८८ (पीआयटी एनडीपीएस अॅक्ट ) अंतर्गत पहिलीच प्रतिबंधात्मक नजरकैद केली आहे. आयुक्तालय स्थापन झाल्यापासूनची ही पहिली कारवाई असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
ही कारवाई सलिम उर्फ अंधा सलिम कुरमुद्दीन सौदागर या सराईत गुन्हेगारावर करण्यात आली आहे. सलिमवर बेळगाव विभागात तब्बल ३७ गुन्हे नोंदवले गेले असून, त्यापैकी १२ मादक पदार्थांशी संबंधित, २१ मालमत्ता गुन्हे, तसेच खून, खुनाचा प्रयत्न आणि साक्षीदारांना धमकावणे असे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत.
अनेक वेळा अटक आणि खटले दाखल झाल्यानंतरही सलिम पुन्हा अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याच्यावर गोव्यातही काही गुन्हे नोंद आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पीआयटी एनडीपीएस कायद्याच्या कलम ३ (१) अंतर्गत प्रतिबंधात्मक नजरकैदेचा आदेश मंजूर केला. त्यानुसार २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली.
पीआयटी एनडीपीएस कायदा, १९८८ हा मादक पदार्थांच्या अवैध वाहतुकीत वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्तींना पुढील गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नजरकैदेची तरतूद करतो. या कारवाईमुळे मादक पदार्थांच्या तस्करीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातही काही गुन्हे नोंद
पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले, आयुक्तालय स्थापन झाल्यापासून पीआयटी एनडीपीएस कायद्यान्वये करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे. हा कायदा ‘गुंडा अॅक्ट’प्रमाणेच कार्य करतो, पण विशेषतः वारंवार मादक पदार्थ गुन्हे करणाऱ्या आरोपींवर लागू केला जातो. या आरोपीचे काही गुन्हे गोव्यातही नोंद आहेत. या संदर्भात बेळगाव पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे.