२०२० मध्ये घडला होता प्रकार : मुलांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण

पणजी : आगशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत २०२० मध्ये दोघा अल्पवयीन भावांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने ३० वर्षीय पश्चिम बंगाल येथील युवकाला दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.
या प्रकरणी आगशी पोलिसांनी १३ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राज्यात कोविडमुळे लाॅकडाऊन लागू केले होते. याच दरम्यान १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पश्चिम बंगाल येथील २५ वर्षीय युवक तक्रारदाराच्या घरी राहत होता. वरील कालावधीत संशयित मुलांच्या खोलीत झोपत होता. याच दरम्यान संशयिताने तक्रारदाराच्या ९ आणि ११ वर्षीय मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तक्रारीची दखल घेऊन आगशीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब यांनी संशयित युवकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या, बाल कायद्याचे कलम आणि पाॅक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून १३ जुलै २०२० रोजी अटक केली. पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने संशयिताला प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर बाल न्यायालयाने संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, उपनिरीक्षक मंदार परब यांनी या प्रकरणी तपास पूर्ण करून बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात याबाबत सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता फ्रान्सिका नोरोन्हा आणि स्वाती परब यांनी युक्तिवाद मांडून आरोपी विरोधात वैद्यकीय तसेच इतर पुरावे सादर केले. तसेच न्यायालयात पीडित मुलांची तसेच साक्षीदारांची उलटतपासणी केली असता, त्यांनी आरोपी युवकाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी आरोपीला दोषी ठरविले.
कोविड काळात लैंगिक अत्याचार
कोविड लॉकडाऊनच्या काळात १ एप्रिल ते ३० जून २०२० दरम्यान संशयित युवक तक्रारदाराच्या घरी राहत होता. त्यावेळी त्याने तक्रारदाराच्या ९ आणि ११ वर्षीय मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता. १३ जुलै २०२० रोजी आगशी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.