
वेंगुर्ला : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या कुटुंबीयांसह वेंगुर्ला तालुक्यातील रेडी–कनयाळ येथील श्री नवदुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत माजी भारतीय क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ देखील उपस्थित होते. दोन्ही माजी खेळाडूंनी श्रद्धा व भक्तीभावाने देवीची पूजा करून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला. गावस्कर यांनी सकाळच्या सुमारास मंदिरात येऊन विधिवत पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर दोघांनी मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधत देवीच्या कृपेने आपल्या जीवनातील प्रेरणादायी क्षणांची आठवण करून दिली. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी माझ्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येथे येतो. देवीचे आशीर्वाद हेच आमच्या कुटुंबाचे बळ आहे, असे गावस्कर यांनी यावेळी सांगितले. त्यांनी रेडी-कनयाळ येथील भक्तीमय वातावरणाचे आणि स्थानिकांच्या आत्मीयतेचे कौतुकही केले.
क्रिकेट जगतातील ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णयुगातील प्रमुख चेहरे राहिले आहेत. मैदानावरील संघर्ष आणि शिस्तीबरोबरच दोन्ही खेळाडू अध्यात्माशीही घट्टपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दर्शनाने स्थानिक भक्तांसाठी आणि चाहत्यांसाठी हा क्षण विशेष ठरला.