महिला विश्वचषक २०२५ : इंग्लंडवर १२५ धावांनी मात

गुवाहाटी : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लॉरा वोल्वार्ड्टच्या दमदार शतकासह मारिजन कापच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडचा पराभव निश्चित केला.
गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्याच संघासाठी घातक ठरला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने आक्रमक शैलीत खेळ करत इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. वोल्वार्ड्टने १४३ चेंडूंमध्ये शानदार १६९ धावा ठोकल्या. तिच्यासह ताझमिन ब्रिट्स (४५ धावा) आणि मारिजन काप (४२ धावा) यांनीही संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला आणि संघाला ५० षटकांत ७ गडी गमावून ३१९ धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडच्या गोलंदाजांकडून सोफी एक्लस्टोनने ४ आणि लाॅरेन बेलने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अक्षरशः उद्ध्वस्त केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४२.३ षटकांत केवळ १९४ धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिले तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. एमी जोन्स, टॅमी ब्यूमाँट आणि हेदर नाईट खाते न उघडताच माघारी परतले. सुरुवातीला ३ धावांवर ३ बळी गमावल्यानंतर इंग्लंडची कर्णधार नॅट स्किव्हर-ब्रंट आणि अॅलिस कॅप्सी यांनी संघाला सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करत इंग्लंडला परत लढतीत आणले. नॅट स्किव्हर-ब्रंटने जबरदस्त खेळी करत ७६ चेंडूत ६४ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. अॅलिस कॅप्सीने ७१ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर डॅनिएल वाॅएट-हॉजने झटपट ३४ धावा केल्या, परंतु मधल्या फळीला काप आणि डि क्लार्क यांनी पूर्णपणे उध्वस्त केले. 
दक्षिण आफ्रिकेकडून अनुभवी मॅरिजन काप हिने पुन्हा एकदा तिच्या उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना झोपवले. तिने ५ फलंदाज बाद केले.नादिन डी क्लार्क, सुने लूस यांनी प्रत्येकी २, आयाबोंगा खाका आणि नोंकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मॅरिजन कापचे ५ बळी आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टचे शतक या दोघींच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव करून इतिहास घडवला.
दोन पराभवांचा घेतला बदला
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने यापूर्वी अनेकदा उपांत्य फेरी गाठली होती, मात्र अंतिम फेरीत पोहाचण्यात अपयशी ठरले होते. २०१७ आणि २०२२ मध्ये उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडनेच पराभूत केले होते. विशेष म्हणजे २०१७ मध्ये इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि भारताला मात देत विश्वचषकावर नाव कोरले होते. पण या वेळी वोल्वार्ड्ट आणि काप यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने दोन पराभवांचा बदला घेत इतिहास रचला आहे.
आता लक्ष्य विश्वविजेतेपद!
या शानदार विजयामुळे दक्षिण आफ्रिका आता पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. त्यांचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. संघाच्या खेळाडूंनी सांगितले की, आमचं पुढचे ध्येय आहे, विश्वचषक जिंकणे आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणे.