
पणजी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या अमली पदार्थ नेटवर्कमधील जवळचा हस्तक दानिश चिकना ऊर्फ दानिश मर्चंट (Danish Merchant alias Danish Chikn) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यात अटक केल्यानंतर सध्या एकच खळबळ माजली आहे. निसर्ग संपदा, फेसाळत्या लाटांचे समुद्रकिनारे यामुळे छोटेसे गोवा राज्य जागतिक पातळीवर चमकत आहे. देशीविदेशी पर्यटक त्यामुळे आकर्षिले जात आहेत. ही सकारात्मक बाब असली तरी अंमलीपदार्थ (drug-related crimes), वेश्याव्यवसाय, हवाला रॅकेट व त्याला जोडून होणारी गुन्हेगारी व गुन्हेगार यांचे गोवा आंतरराष्ट्रीय केंद्र (International hub) बनत चालले आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गुन्हेगारी विश्वातील डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा दानिश चिकना याला गोव्यात अटक केल्यानंतर ही बाब अधिक अधोरेखित होऊ लागली आहे. दानिश चिकना याला गोव्यात अटक केल्यानंतर त्याचे याठिकाणी काही नेटवर्क आहे का? हे शोधून काढण्याचे आव्हान सध्या गोव्याची पोलीस यंत्रणा व एकूण तपास यंत्रणापुढे आहे. एकूण अमली पदार्थ व्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्याची संधी तपास यंत्रणांना आहे.
पोलिस रेकॉर्ड आणि अलीकडील जप्तींवरून राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी आणि सेवन केले जाते याला पुष्टी मिळते. त्यात दानिश चिकना याला गोव्यात अटक केल्यानंतर हे काळे सावट अधिक गडद बनले आहे. हे छोटेसे राज्य ट्रान्झिट पॉइंटपासून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलसाठी वितरण केंद्र बनत चालले आहे. ड्रग्ज व्यापारात परदेशी व स्थानिकांचा समावेश आहे. पर्यटक बनून येणारे अनेक विदेशी ड्रग्जच्या व्यवहारात सापडत आहेत. रशिया, नायजेरिया यांचा त्यात समावेश आहे. काही स्थानिक ही या व्यवहारात सापडत आहेत.
अलिकडच्या काळात घडलेल्या मोठ्या घटना: अधिकाऱ्यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा कोकेनचा साठा जप्त केला होता. ड्रग्ज सिंडिकेटप्रकरणी याच दिवसांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एक प्रमुख साथीदार दानिश चिकना याला अटक केली आहे. त्यानंतर तपास यंत्रणा गोव्यातील ड्रग्जची पाळेमुळे खणून काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. काही पोलीस व ड्रग्ज माफिया यांचे संगनमत असल्याचे होणारे आरोप चिंता वाढवणारे आहेत. एका स्वीडिश मॉडेलने ही यासंदर्भात माहिती दिली होती.
इतर गुन्हेगारी कारवाया
गोवा मानवी तस्करी, महिलांचे होणारे लैंगिक शोषण यासाठीही ओळखले जाऊ लागले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) नुसार, भारतातील अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीची प्रकरणे नोंद होऊ लागली आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीबरोबरच मनी लाँडरिंगच्या माध्यमातून पैशांची होणारी देवघेवीची प्रकरणेही पुढे येऊ लागली आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते गोव्यात संघटित "ड्रग माफिया" नाहीत. गोवा हे फक्त एक उपभोग केंद्र आहे. मात्र, दानिश चिकना याला गोव्यात अटक केल्यानंतर याकडे अधिक गांभीर्याने पाहून सखोल तपास करण्याची मागणी जोर धरत आहे.