वेळ्ळी चर्च परिसरात पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकरण : सर्व २२ संशयितांची निर्दोष मुक्तता

ठोस पुराव्यांअभावी मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाचा निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
वेळ्ळी चर्च परिसरात पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकरण : सर्व २२ संशयितांची निर्दोष मुक्तता

मडगाव : २०१२ मध्ये वेळ्ळी येथील चर्च परिसरात बेकायदा जमाव जमवून पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. आता या प्रकरणातून  मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने फादर रोमानो गोंसाल्विस यांच्यासह या प्रकरणातील सर्व २२ संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा सादर न झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

नेमके काय घडले होते?

२५ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ९ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेळ्ळी येथील सेंट फ्रान्सिस झेविअर चर्च आणि सेंट फ्रान्सिस झेविअर हायस्कूलच्या परिसरात ही घटना घडली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी गुप्तचर म्हणून गेलेल्या सीआयडी पोलीस कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला चढवला होता.

या जमावाने बेकायदेशीर जमाव करत दगड, काचेच्या बाटल्यांनी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कपिल नाईक, हेड कॉन्स्टेबल कृष्णानंद राणे आणि पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप देसाई यांच्यासह सीआरपीएफचे कर्मचारी संदीप केसरकर, दीपक कुमार सिंग आणि दया शंकर सिंग यांनाही दुखापत केली होती.

सर्व संशयितांची मुक्तता

या प्रकरणात स्व. फा. रोमानो गोन्साल्विस, पॅट्रीक डिसिल्वा, डार्विन डिसिल्वा, फादर लुसिओ डायस यांच्यासह सुमारे १५०० ज्ञात अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर, सरकारी पक्षाकडून कोणताही ठोस पुरावा (Solid Evidence) सादर न झाल्यामुळे सर्व संशयितांची खटल्यातून मुक्तता केली आहे.

न्याय मिळण्यास विलंब  : फादर लुसियो डायस

या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर फादर लुसियो डायस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्व संशयित निर्दोष सुटले आहेत. न्याय झाला आहे, पण तो मिळण्यासाठी बराच विलंब झाला. भविष्यातील प्रकरणे जलदगतीने निकाली निघतील, अशी आशा आहे.

हेही वाचा