वाहतूक खात्याकडून नवीन नियमावली जारी

पणजी : राज्यात वाहनांना फॅन्सी क्रमांक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता नवीन वाहनांची नोंदणी करताना फॅन्सी किंवा तुम्हाला हवा असणार क्रमांक हवा असेल तर ९ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागेल. याबाबत वाहतूक खात्याने नुकतीच मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यावर आक्षेप अथवा सूचना देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. वाहतूक खात्याचे संचालक पी प्रविमल अभिषेक यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
यानुसार ०००१ ते ०००९ यातील हे क्रमांक हवे असतील तर चार चाकीसाठी १ लाख तर दुचाकी आणि तीनचाकीसाठी १५ हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. ००११,००२२, ००३३ असे म्हणजे ०० नंतर एकसारखे आकडे हवे असल्यास चारचाकीला ४० हजार तर दुचाकीला १५ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. पहिला आकडा शून्य व अन्य तीन क्रमांक एक सारखे हवे असतील तर चार चाकीस ७५ हजार व दुचाकीस २० हजार रुपये शुल्क आहे.
वाहन क्रमांकमध्ये एक सारखे चार आकडे म्हणजेच ११११ अशा पद्धतीचा क्रमांक हवा असेल तर चारचाकीला ८० हजार तर दुचाकीला २५ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. वाहन क्रमांकात दोन आकडे एकसारखे म्हणजेच ११२२, ७७३३ अशा पद्धतीच्या क्रमांकासाठी चारचाकीस ४० हजार तर दुचाकी १५ हजार रुपये द्यावे लागतील. १२३४ अशा चढत्या किंवा ९८७६ अशा उतरत्या आकड्यांचा क्रमांक हवा असल्यास चारचाकीस २५ हजार तर दुचाकी ९ हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.
याशिवाय वर उल्लेख नसलेल्या पद्धतीचे सोडून वाहन मालकास त्याच्या आवडीचा क्रमांक घ्यायचा असेल तर चारचाकीसाठी २५ हजार तर दुचाकीसाठी १० हजार रुपये शुल्क आहे. अधिसूचनेनुसार ०७८६ या क्रमांकासाठी चारचाकी मालकांना १ लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर दुचाकी मालकांना ४० हजार रुपये शुल्क आहे. व्यवसाय वाहनांमध्ये चारचाकीसाठी ५० हजार तर दुचाकीसाठी २० हजार रुपये द्यावे लागतील.