रिक्त मंत्रीपद कुणाला याची उत्सुकता

पणजी : सरकारने ९ संस्था व महामंडळांवर (Corporation ) नव्या अध्यक्षांची निवड केली आहे. त्यात जास्त करून भारतीय जनता पार्टीतील (भाजप) काही माजी मंत्री (Minister ) आजीमाजी आमदारांचा (Mla) समावेश आहे. २०२७ ची विधानभा निवडणूक (Assembly election) व यापुढील जिल्हा पंचायत (Zilla Panchyat ) नगरपालिका निवडणुका नजरेपुढे ठेवून ही वर्णी लावल्याचे मानले जात आहे.
आपल्याला मंत्रीपद, चांगली खाती मिळावीत ही काही आमदारांची इच्छा होती. चांगली महामंडळे मिळावीत ही आजीमाजी आमदारांची अपेक्षा होती. त्यातून असंतोषही वाढत होता. विधानसभा, जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणुका जवळ आल्या असल्याने, हा असंतोष शमवण्यासाठी ही वर्णी लावल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. कृषीमंत्री रवी नाईक यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मंत्रीपद रिक्त असून, हे मंत्रीपद कुणाला मिळणार यासंदर्भात ही चर्चा सुरू आहे. मंत्री पदावरून वगळण्यात आलेले माजी साबांखामंत्री निलेश काब्राल यांचे काय? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
काही राजकीय पक्ष तसेच नेत्यांनी रवी नाईक यांचे मंत्रीपद त्यांचे पुत्र रितेश नाईक किंवा रॉय नाईक यांना द्यावे व सहा महिन्यात सर्वांनी सहकार्य करून त्यांना निवडून द्यावे, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हे मंत्रीपद नेमके कुणाला मिळणार यासंदर्भातही उत्सूकता लागून राहिली आहे.
महामंडळे, संस्थांवर वर्णी लागलेल्या आजीमाजी आमदारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. जीएसआयडीसी : आमदार मायकल लोबो, अध्यक्ष. कला अकादमी : माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, अध्यक्ष. जीटीडीसी : आमदार केदार नाईक, अध्यक्ष. मल:निस्सारण महामंडळ : आमदार संकल्प आमोणकर, अध्यक्ष. कायदा आयोग : माजीमंत्री आलेक्स सिक्वेरा, अध्यक्ष. एससी व ओबीसी वित्त महामंडळ : माजीमंत्री दयानंद मांद्रेकर, अध्यक्ष. बालभवन : माजी आमदार दयानंद सोपटे, अध्यक्ष. खादी ग्रामोद्योग : आमदार आंतोन वाझ, अध्यक्ष, सर्वानंद भगत, उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.