प्रशांत किशोर यांच्या निवडणुकीतील कामगिरीकडे लक्ष

Story: राज्यरंग - बिहार |
5 hours ago
प्रशांत किशोर यांच्या निवडणुकीतील कामगिरीकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राजद, काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी आणि जदयू, भाजप आणि मित्रपक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. व्होट वाईब यांनी केलेल्या मतदानपूर्व चाचणीने प्रशांत किशोर याचा जनसुराज पक्षही चांगली कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी नाही तर तिरंगी होईल, असे मानले जात आहे.

भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह स्टार प्रचारक विविध ठिकाणी जाहीर सभा घेऊन रालोआच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. व्होट वाईबच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, मतदार दोन प्रमुख गटांमध्ये जवळजवळ समान प्रमाणात विभागलेले आहेत. सुमारे ३४.७ टक्के मतदारांनी महाआघाडीवर, तर ३४.४ टक्के मतदारांनी रालोआवर विश्वास व्यक्त केला आहे.

हा सर्वे १५ ते १९ ऑक्टोबर या काळात करण्यात आला. या सर्वेमध्ये राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमधील दहा हजारांहून अधिक लोकांचे मत समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील विशेष गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर आणि त्यांच्या जनसुराज पक्षाची कामगिरी. सुमारे १२ टक्के मतदारांना वाटते की, यावेळी जनसुराजचे उमेदवारही जिंकू शकतात. पक्षाने राज्यातील सर्व २४३ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. 

प्रशांत किशोर स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नसले तरीही त्यांची लोकप्रियता कायम आहे. सुमारे १३ टक्के मतदारांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. पक्षाची मतांची टक्केवारी ९ ते १० टक्क्यांच्या दरम्यान राहू शकते. राजकीय तज्ज्ञांना वाटते की, जनसुराज पक्षाने मतांची टक्केवारी दहा टक्क्यांपेक्षा जास्त राखली तर त्यांचे उमेदवार अनेक जागांवर निर्णायक भूमिका बजावू शकतात. तेजस्वी यादव महाआघाडीचा चेहरा आहेत, अनुभव आणि प्रशासनाच्या प्रतिमेसह नितीशकुमार रिंगणात आहेत, तर प्रशांत किशोर जनतेमध्ये पर्याय म्हणून उदयास येत आहेत.

प्रशांत किशोर यांनी मुसलमानबहुल भागातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते ‘बिहार बदलाव इजलास’सारखे कार्यक्रम घेऊन परिवर्तनाची मोहीम राबवत आहेत. नववी अनुत्तीर्ण झालेल्या तेजस्वी यादवांना लक्ष्य करून ते मुसलमानांना मुलांच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करत आहेत. भाजपला घाबरून राजदला मत देऊ नका. भविष्याचा विचार करून राज्यात परिवर्तनाला पाठिंबा द्या, असे त्यांचे सांगणे आहे. राजद, काँग्रेस, सीपीआय, आम आदमी पक्ष, एआयएमआयएम या पक्षांना डावलून मुसलमान मतदार जनसुराज पक्षाला कौल देतात का, हे पहावे लागेल.

- प्रदीप जोशी