भारतात महिला असुरक्षित का?

भारतात गेल्या आठ-दहा वर्षांत स्त्रियांवरील अत्याचार आणि लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे इतक्या निर्लज्जपणे आणि निर्दयतेने घडू लागली आहेत की समाजाचा चेहराच काळवंडल्यासारखा दिसतो आहे.

Story: विचारचक्र |
10 hours ago
भारतात महिला असुरक्षित का?

बदलापूरसारख्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हा केवळ एक गुन्हा नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या मानसिक अधःपतनाचे प्रतीक होता. आरोपीचे एन्काऊंटर करूनही समाजात भय निर्माण झाले नाही, कारण खरे सूत्रधार, राजकीय आणि आर्थिक प्रभावशाली लोक, अद्याप मोकाट फिरत आहेत. कारण त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. साताऱ्यातील एका डॉक्टर महिलेला पोलिसांकडून झालेल्या छळामुळे आणि राजकीय विकृतींमुळे आत्महत्या करावी लागते. हे फक्त वैयक्तिक दुःख नाही, तर ते संस्थात्मक हिंसेचे प्रतीक आहे. कायद्याचे रक्षण करणारेच जर स्त्रीच्या सन्मानावर गदा आणत असतील, तर स्त्री कुणाकडे मदतीसाठी जाईल?

सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा घसरत चाललेली आहे. नुकतेच इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंवर झालेल्या छेडछाडीच्या घटनेने जगभरातील माध्यमांमध्ये भारताची छी-थू झाली. अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. त्यामुळे विकसित आणि प्रगत देशातील अनेक राष्ट्रांचे नेते त्यांच्या स्त्री नागरिकांना चेतावणी देतात की, “भारतात एकट्या महिलांनी प्रवास करताना सावध राहावे. कारण भारत महिलांसाठी सुरक्षित देश नाही.” त्यांनी अशा सूचना जाहीरपणे द्याव्यात ही आपली राष्ट्रीय लाज घालवणारे आहे.

या सर्व घटनांच्या मागे खोलवर रुजलेला पितृसत्ताक विचार आणि मनुस्मृतीतील स्त्रीविरोधी संस्कार हे प्रमुख कारण आहे. “स्त्री ही पुरुषाच्या अधीन असावी”, “तिला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे”, या विचारांनी शेकडो वर्षांपासून पुरुषांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. म्हणून मुलींनाच सल्ले दिले जातात की, “मुलींनी सातच्या आत घरात यायला हवे”, “रात्री अपरात्री एकट्याने फिरायला जाऊ नये”, “अमुकतमुक प्रकारचे कपडे घालू नयेत”, इत्यादी. कारण स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे, तिचे अस्तित्व पुरुषाच्या सुखासाठीच आहे, हा विचार माध्यमांमध्ये आणि धार्मिक भाष्यांमध्येही पसरलेला आहे. आज प्रसारमाध्यमांतल्या मार्केट-धार्जिण्या जाहिरातींच्या भडीमारानं भौतिकवादी, चंगळवादी दृष्टीकोन रुजण्याला खतपाणी मिळत आहे. स्त्रियांच्या संदर्भात पूर्णतः शरीर पातळीवरचे थेट संदेश जाहिरातींमधून दिले-घेतले जात आहेत. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी हे असे करणे खूप आवश्यक आहे, असा संदेश महिलांसाठी प्रसृत केला जातो. त्याच वेळी पुरुषांमध्येही स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रुजतो. म्हणूनच शिक्षण घेऊन, नोकरी करून, आत्मनिर्भर झालेल्या स्त्रियाही या हिंसक मानसिकतेपासून सुरक्षित नाहीत. शासन आणि न्यायव्यवस्था या दोन्हीही स्त्रीच्या सुरक्षेबाबत अपयशी ठरल्या आहेत. प्रत्येक वेळी राज्य सरकार “दोषींना कठोर शिक्षा होईल,” असे म्हणते, पण मागील दाराने त्यांच्याच पाठीशी उभे राहते. निवडणुकीतील समीकरणे, जातीय-धार्मिक मतसंख्या आणि सत्तेची लालसा, या सगळ्यांच्या आड न्याय आणि नैतिकता गाडली जाते. जेव्हा गुन्हेगार राजकीय संरक्षणाखाली मोकाट फिरतात, तेव्हा समाजात असा संदेश जातो की “स्त्रीवर अत्याचार करणे हे काही मोठे पाप नाही.” हीच विचारसरणी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचते, आणि मग आपण पुन्हा पुन्हा त्याच घटनांची पुनरावृत्ती पाहतो.

अशा विकृत घटना घडू नयेत म्हणून समाजानेच आता आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. आपल्या घरातून, शाळेतून, माध्यमांतून आपण कोणते संस्कार देत आहोत हे तपासावे लागेल. मुलींवर बंधने घालण्यापेक्षा मुलांवरच मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा संस्कार केला जाणे आवश्यक आहे. मुलांना “स्त्रीचा सन्मान करा” हे फक्त सांगून उपयोगी नाही, तर ते वर्तनातून दाखवावे लागेल. घरातील पालकाने आपल्या मुलांना आणि मुलींनाही एका समान पातळीवर वाढवण्यास सुरुवात केली पाहिजे. धर्म, जात, परंपरा या सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे तो माणुसकीचा धर्म. जोपर्यंत समाज माणुसकीला धर्मापेक्षा खालचे स्थान देईल, तोपर्यंत अशा अत्याचारांची मालिका सुरूच राहील. स्त्री ही फक्त माता, पत्नी किंवा बहीण नाही तर ती एक स्वतंत्र, संवेदनशील आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. तिच्या सन्मानातच राष्ट्राचा सन्मान दडलेला आहे. जे समाज स्त्रीला संरक्षण देऊ शकत नाहीत, ते संस्कृतीचे नव्हे तर क्रौर्याचे प्रतीक ठरतात. म्हणूनच आता प्रश्न “सरकार काय करतं?” एवढ्यावर न थांबता, “आपण काय करतो आहोत?” असा विचार प्रत्येकाने स्वतःला विचारावा लागेल. न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांच्यावर टीका करणे योग्यच आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या अंधश्रद्धा, दांभिकता आणि पितृसत्ताक संस्कार यांच्यावरही प्रहार करणे गरजेचे आहे.

म्हणूनच लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद करत खेळणी वा घरातील कामे देऊ नयेत. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना “तू बायल्या सारखा का वागतो?”,“ हातात बांगड्या भरल्या आहेस का?”, “मुलीसारखा मुळूमुळू काय रडतोस?” अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. त्याचबरोबर मुलींवरही पालकांनी “मुलांसारखा दांगटपणा काय करतेस?”,“जोरजोरात का हसतेस?” अशी बंधने घालू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे,असे समजून एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली, तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले, तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल आणि “भारतात महिला शांततेने का जगू शकत नाही,” असा हाताश प्रश्न विचारण्याची वेळ उच्च न्यायालयावर येणार नाही.

जर आपण खरोखर ‘भारत माता’ या संकल्पनेवर प्रेम करतो, तर त्या भारत मातेला सन्मान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. तीही फक्त केवळ घोषणांमधून नव्हे, तर कृतीतून. स्त्रीला समानता, सुरक्षितता आणि न्याय मिळालाच पाहिजे, नाहीतर आपल्या संस्कृतीची सर्वश्रेष्ठता ही केवळ पोकळ गर्वगाथा राहील. आणि भविष्यातील इतिहास आपल्याला निर्दयी समाज म्हणून ओळखेल. जगभरात आपली अशी ओळख असणे आपल्याला आवडेल काय?


- जगदीश काबरे

(लेखक विज्ञान लेखक व अंनिसचे कार्यकर्ते आहेत.)