भारतात प्रथमच आयोजन : ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात थरार

म्हापसा : जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (जीएफआय), क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, गोवा आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात येत आहे.
ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत, दररोज सकाळी १० वाजल्यापासून, पेडे इनडोअर स्टेडियम, करासवाडा, म्हापसा येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत आशियातील उत्कृष्ट अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्ट्स एकत्र येऊन आपली कौशल्ये प्रदर्शित करतील. भारतामध्ये प्रथमच या आशियाई स्तरावरील अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन होत असून, हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. या आयोजनामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस, सचिव (क्रीडा) संतोश सुखदेवे, गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक डॉ. अजय गावडे, एजीयु टेक्निकल प्रेसिडेंट आयगुल ड्यूकेनबायेव्हा, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. सी. प्रभाकर तसेच आंतरराष्ट्रीय अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने क्रीडामंत्री रमेश तावडकर यांचे आभार मानले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील उत्कृष्ट दर्जाचे प्रदर्शन, स्पर्धा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे. या माध्यमातून ताकद, कलात्मकता आणि टीमवर्कचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचे हे प्रतीक ठरणार आहे.
स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना संतुलन, समन्वय आणि सर्जनशीलतेचे अद्भूत प्रदर्शन पाहायला मिळेल. खेळाडू अत्यंत अवघड हालचाली आणि जोखमीच्या कृतीमधून आपली कसब दाखवतील. या स्पर्धेत आशियातील सर्वोत्तम खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी होत असल्याने ही गोव्याच्या इतिहासातील एक भव्य आणि रोमांचक क्रीडा मेजवानी ठरणार आहे.
डॉ. सी. प्रभाकर म्हणाले, ही स्पर्धा केवळ विजयाची नाही, तर टीमवर्क, शिस्त आणि समर्पणाचा उत्सव आहे. ही स्पर्धा भारतातील तरुण जिम्नॅस्ट्सना प्रेरणा देईल आणि या खेळाच्या भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करेल.
१४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धा २०२५ हा भारताच्या क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. संपूर्ण आशियातून खेळाडू आणि प्रेक्षक गोव्यात एकत्र येण्यासाठी सज्ज आहेत आणि या अविस्मरणीय स्पर्धेसाठी गोवा उत्साहाने उजळून निघाला आहे.
ही स्पर्धा एकतेचा, कलात्मकतेचा आणि खेळातील उत्कृष्टतेचा उत्सव आहे. या आयोजनामुळे संपूर्ण आशियात या क्रीडाप्रकाराला अधिक बळकटी मिळेल. - आयगुल ड्यूकेनबायेव्हा, एजीयु टेक्निकल प्रेसिडेंट
गोव्याची आधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रीडाप्रेमी संस्कृती यामुळे हे आयोजन विशेष ठरणार आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. - सुधीर मित्तल, जीएफआय अध्यक्ष