आज मुंबईत रंगणार महामुकाबला

महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना : भारत-द. आफ्रिका आमने सामने

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
आज मुंबईत रंगणार महामुकाबला

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामन्याचा महामुकाबला रविवारी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी भारताने २० सामने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेला १३ विजय मिळवता आले आहेत. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर बलाढ्य मानले जातात, त्यामुळे अंतिम लढत तुफानी ठरणार हे निश्चित आहे.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारताने दमदार विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मात्र निर्णायक क्षणी न्यूझीलंडवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. बांगलादेशविरुद्धचा शेवटचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला, पण उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये धडक मारली.
भारतीय महिला संघाने २०१७ आणि २००५ नंंतर तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
आजवर दोघापैकी एकाही संघाला महिला वनडे विश्वचषक जिंकता आलेला नाही, त्यामुळे दोघांनाही इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे जगाला एक नवीन विश्वविजेता मिळणार आहे.
अंतिम सामन्यासाठी एलॉइस शेरिडन आणि जॅकलिन विल्यम्स मैदानावरील पंच असतील. शेरिडन आणि विल्यम्स यांनी अलिकडच्या उपांत्य सामन्यातही पंच म्हणून काम पाहिले. पंचांच्या ताफ्यात सू रेडफर्न हे तिसरे पंच, निमाली परेरा चौथे पंच आणि मिशेल परेरा या सामनाधिकारी आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गट टप्प्यात सामना खेळवला गेला, जो आफ्रिकन संघाने ३ गडी राखून जिंकला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. पण दोन्ही संघांसाठी ही बातमी चांगली नसणार आहे, कारण दोन्ही संघांपैकी कधीही महिला एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावलेले नाही. दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर भारताने यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा पराभव स्वीकारावा लागला. भारत-दक्षिण आफ्रिका सामना रविवारी पावसामुळे थांबवल्यास सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही ५० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता असल्याने सामन्याची षटके कमी करावी लागली तरी सामना रविवारीच पूर्ण करावा असा पंचांचा प्रयत्न असेल.
भारतीय संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, हरलीन देओल, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, श्री चरणी, क्रांती गौड.
दक्षिण आफ्रिका संघ :
लॉरा वॉल्वार्ड्ट (कर्णधार), आयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लार्क, मारिझान काप, तॅझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, ॲनिएरी डर्कसन, ॲनीके बॉश, सुने लूस, मासाबाता क्लास, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नॉन्ड्युमिसो शंगासे.
बीसीसीआयकडून १२५ कोटींचे बक्षीस
भारतीय पुरुष संघाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यावर बीसीसीआयने १२५ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. आता महिला संघाने २०२५ चा वनडे विश्वचषक जिंकल्यास तेवढ्याच रकमचे बक्षीस मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. बीसीसीआय सूत्रांच्या मते, जर आमच्या मुलींनी विश्वचषक जिंकला, तर बक्षीस पुरुष संघाइतकेच असेल. मात्र घोषणा ट्रॉफीनंतरच केली जाईल.
आयसीसीकडून विक्रमी बक्षीस रक्कम
या विश्वचषकासाठी आयसीसीने ‘जेंडर पे-पॅरिटी पॉलिसी’ लागू केली आहे. महिला आणि पुरुष विश्वचषकासाठी समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.
आयसीसीकडून देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम
संघ                           डॉलरमध्ये रक्कम                   भारतीय रुपयांमध्ये

विजेता                       ४.४८ दशलक्ष                           ३९.७ कोटी
उपविजेता                  २.२४ दशलक्ष                           १९.८ कोटी
उपांत्य फेरीतील संघ   १.१२ दशलक्ष                             ९.९ कोटी
प्रत्येक ग्रुप विजय        ३४,३१४                                    २८.८ लाख
हरमनप्रीत कौर ‘सिक्सर क्वीन’ होण्याच्या मार्गावर
कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. ​तिने आतापर्यंत २२ षटकार ठोकले असून, सोफी डेव्हाईनच्या २३ षटकारांच्या विक्रमापासून फक्त दोन षटकार दूर आहे. अंतिम सामन्यात हे साध्य केल्यास हरमनप्रीत महिला क्रिकेटच्या इतिहासातील ‘सिक्सर क्वीन’ ठरेल.
कपिल देव, धोनीनंतर हरमनप्रीतचा सुवर्णकाळ
१९८३ मध्ये कपिल देव आणि २०११ मध्ये एम.एस. धोनी यांनी भारताला पुरुष विश्वचषक जिंकून दिला. आता २०२५ मध्ये हरमनप्रीत कौर त्यांच्याच पंक्तीत नाव कोरणार का, हे २ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. महिला क्रिकेटसाठी हा सामना फक्त ट्रॉफीसाठी नाही, तर समान सन्मान आणि गौरवाच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे.
आजचा सामना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
विश्वचषक २०२५ अंतिम सामना

वेळ : दुपारी ३ वा.
स्थळ : डी. वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार