दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात : दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे विजेतेपद पटकावले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २९८ धावा केल्या होत्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांवर आटोपला. भारतीय महिलांनी प्रथम विश्वचषकावर आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने एकटीने झुंज देत शतकी खेळी केली तिने ९८ चेंडूत ११ चौकार, १ षटकाराच्या सहाय्याने १०१ धावा केल्या. तिच्या या खेळीशिवाय इतर कोणतीही फलंदाज मोठी भागीदारी करू शकली नाही. ताझमिन ब्रिट्सने २३ धावा, सुन लूसने २५ धावा तर अनेरी डर्क्सनने ३५ धावा केल्या. इतर फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकल्या नाहीत. मरिझान कॅप (४), सीनालो जाफ्ता (१६), क्लो ट्रायन (९), नाडीन डी क्लार्क (१८) लवकर बाद झाल्या. अखेरीस संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ २४६ धावांवर गारद झाला.
भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्माने जबरदस्त कामगिरी करत ५ बळी घेतले. तिने अचूक लाईन आणि लेंग्थ ठेवत विरोधी फलंदाजांना रोखून धरले. तिच्या साथीला शेफाली वर्माने २, तर राधा यादव आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. स्मृती मनधानानेही ४५ धावा (५८ चेंडू, ८ चौकार) करून शेफालीला चांगली साथ दिली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (२४) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२०) यांनीही डाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधल्या फळीत शेफालीच्या बाद झाल्यानंतर थोडी घसरण झाली.
दीप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत संयमी आणि अचूक फलंदाजी करत ५८ धावा (५८ चेंडू, १ चौकार) झळकावल्या. तिच्या खेळीमुळे संघ ३०० च्या जवळ गेला. रिचा घोषने शेवटी फटकेबाजी करत केवळ २४ चेंडूत ३४ धावा ठोकल्या, ज्यात दोन षटकारांचा समावेश होता.
भारतीय संघाने ५० षटकांत भारताने ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे अयाबोंगा खाकाने ५८ धावांत ३ बळी घेतले. नॉनकुलुलेको म्लाबा, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
स्मृती मानधनाचा विक्रम
भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आपल्या खेळीतील २१वी धाव पूर्ण करताच तिने भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडला. ती आता एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. या संपूर्ण विश्वचषकात स्मृती मानधनाचा फॉर्म अत्यंत शानदार राहिला आहे.
स्मृती मानधना आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ मध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी झाली आहे. यासोबतच, ती एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर होता, जिने २०१७ च्या महिला वनडे विश्वचषकात ४०९ धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने विश्वचषक २०२५ मध्ये ४३४ धावा केल्या आहेत. या विश्वचषकात स्मृती मानधनाने टीम इंडियासाठी सलामीला उतरून बहुतांश सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची युवा सलामीवीर शेफाली वर्मा हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ धावांची शानदार खेळी करून मोठा इतिहास रचला आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताच्या डावाला बळकटी मिळालीच, शिवाय तिने एकाच सामन्यात ८ वर्षांपूर्वीचे दोन मोठे विश्वविक्रम मोडण्यात यश मिळवले.
पूनम राऊतचा मोडला ८ वर्षांपूर्वीचा विक्रम
सेमीफायनलपूर्वी दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी मुख्य संघात आलेल्या शेफाली वर्मासाठी हा अंतिम सामना तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरला. सेमीफायनलमध्ये फारशी चमक न दाखवता आलेल्या शफालीने फायनलमध्ये मात्र आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत फलंदाजी केली. शफालीने ७८ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली.
या खेळीसह ती महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. यासह शेफालीने पूनम राऊतचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. पूनम राऊतने २०१७ च्या महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८६ धावांची खेळी साकारली होती.
शेफाली वर्माने केवळ पूनम राऊतचा विक्रमच मोडला नाही, तर तिने १२ वर्षांपूर्वीचा आणखी एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती आता महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात ५० हून अधिक धावा करणारी जगातील सर्वात युवा महिला खेळाडू बनली आहे. शेफालीने २१ वर्षे २७८ दिवसांच्या वयात ही ५० हून अधिक धावांची खेळी साकारली.
यापूर्वी हा विक्रम जेस कॅमरून (आता जेस डफिन) यांच्या नावावर होता. त्यांनी २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये २३ वर्षे २३५ दिवसांच्या वयात ७५ धावांची खेळी केली होती. सेमीफायनलपूर्वी शैफालीला मुख्य संघात संधी मिळाली होती आणि तिने अंतिम सामन्यात केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
शेफाली-दीप्तीच्या अर्धशतकांची साथ
फायनलमध्ये दीप्ती शर्मा नंबर ५ वर फलंदाजीला उतरली. चौथ्या गड्यासाठी दीप्ती आणि हरमनप्रीत कौर यांच्यात ५२ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर अमनजोत कौरसोबत २२ आणि ऋचा घोषसोबत ४७ धावांची भागीदारी केली. या भागीदारींच्या बळावर भारत ५० षटकांत २९८ धावांपर्यंत पोहोचला. भारताकडून शेफाली वर्माने ८७, स्मृती मंधानाने ४५ धावा केल्या. शेफाली शतकापासून अवघ्या १३ धावांनी दूर राहिली.
एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू:
स्मृती मानधना – ४३४ धावा (२०२५)
मिताली राज – ४०९ धावा (२०१७)
पूनम राऊत – ३८१ धावा (२०१७)
हरमनप्रीत कौर – ३५९ धावा (२०१७)
स्मृती मानधना – ३२७ धावा (२०२२) 
मालिकावीर दीप्ती शर्मा
दीप्ती शर्माचा विश्वविक्रम
दीप्ती शर्माने या सामन्यातील ५८ धावांच्या खेळीदरम्यान एका विश्वचषक स्पर्धेत २०० पेक्षा जास्त धावा आणि १५ पेक्षा जास्त बळी घेणारी पहिली खेळाडू ठरली. यापूर्वी विश्वचषकाच्या एका आवृत्तीत कोणत्याही खेळाडूने हा विक्रम केला नव्हता. तसेच, नंबर ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका विश्वचषकात तीनवेळा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारी ती तिसरी फलंदाज ठरली. यापूर्वी हरमनप्रीत कौरने २०२२ मध्ये आणि अॅश्ले गार्डनरने २०२५ मध्येच हा पराक्रम केला होता.
विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाज
डेबी हॉकली (न्यूझीलंड) : १५०१ धावा
लॉरा वोल्वार्ड्ट (दक्षिण आफ्रिका) : १३२८ धावा
मिथाली राज (भारत) : १३२१ धावा
जेनेट ब्रिटिन (इंग्लंड) : १२९९ धावा
शार्लट एडवर्ड्स (इंग्लंड) : १२३१ धावा