फोंड्यात पोटनिवडणुकीच्या हालचाली वेगवान

फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आपल्या स्तरावर घेणार असल्याचे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारपासून त्यांनी खडपाबांध येथील आपल्या कार्यालयात लोकांना भेटण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, तो प्रत्येक कार्यकर्त्याने मान्य करायलाच हवा. उमेदवारी रॉय नाईक यांना द्यायची की मला, हे ठरवण्याचा अधिकार पक्षालाच आहे.
ते पुढे म्हणाले की, तूर्तास आम्ही दोघे भाऊ मिळून स्व. रवी नाईक यांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांच्या कामाला प्राधान्य देत आहोत. भाजपमध्ये आणखी काही इच्छुक उमेदवार असल्याबाबत विचारले असता, रितेश नाईक यांनी भाष्य करण्याचे टाळले.
कृषिमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर या मतदारसंघातील राजकारणाला वेग आला आहे. येत्या काही महिन्यांत पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली असून सत्ताधारी पक्षाच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
फोंड्यात ज्यांनी विविध विकास प्रकल्प राबवले त्या रवी नाईक यांना आदरांजली म्हणून त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून द्यावे, असा आवाज काही ठिकाणी उठत असला तरी अनेक इच्छुक पुढे येत आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत पेच निर्माण झाला आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता असून त्याच सुमारास फोंड्याची पोटनिवडणूकही होईल, असे संकेत आहेत. दोन्ही निवडणुका सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
भाजपमधील इच्छुकांची वाढती यादी
भाजपकडून फोंड्यात रितेश नाईक, विश्वनाथ दळवी आणि रॉय नाईक ही तिन्ही नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. रितेश नाईक सध्या शांत आहेत, मात्र दळवी आणि रॉय नाईक यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. तसेच माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजपने ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही नीती कायम ठेवली आहे, कारण अंतिम क्षणी कोणाचे नाव जाहीर होईल हे निश्चित सांगता येत नाही.
काँग्रेसचा निर्धार, मगोमधील बंड
काँग्रेसने फोंडा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून पक्षाकडून राजेश वेरेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या मते, राज्यात सध्या भाजपविरोधी वातावरण असून त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. दरम्यान, मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मगोच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. पूर्वी सुदिन आणि दीपक ढवळीकर यांनी भाजपच्या उमेदवारास समर्थन देण्याचे संकेत दिले होते, मात्र भाटीकर यांच्या भूमिकेमुळे मगोच्या गोटात संभ्रम वाढला आहे.
भंडारी समाजाचा होणार विचार?
फोंडा मतदारसंघात भंडारी समाजाचे मतदार सर्वाधिक असून अन्य बहुजन समाजाचेही प्रमाण मोठे आहे. सुमारे ६० टक्के मतदार हे बहुजन समाजातील असल्याने उमेदवार निवडताना या घटकाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. भंडारी समाजाने रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देऊन त्यांना बिनविरोध निवडून आणावे, अशी मागणी केली आहे. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने ही मागणी धुडकावून पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भंडारी समाजात असंतोष निर्माण झाला आहे.