
पणजी : गोव्यातील (Goa) नार्वे (Narve) येथे गंगा नदीत होते तशी ‘घाट आरती’ (Ganga-style ‘Ghat Aarti’ project) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पाला सीआरझेडची मंजुरी मिळाली आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) नार्वेतील मांडवी नदीच्या काठी ‘घाट आरती’ म्हणून विकसित करण्याचा आध्यात्मिक प्रकल्प राबवणार आहे.
महामंडळ याठिकाणी "आरती डेक" विकसित करण्यासाठी १०.५ कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्यामध्ये भगवान शिवाची मोठी मूर्ती देखील समाविष्ट असू शकते.
गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत जीसीझेडएमएने (GCZMA) या प्रकल्पाला सीआरझेड (CRZ) मंजुरी दिली होती. मात्र, या विकसित करायच्या सर्व सुविधा तात्पुरत्या स्वरूपाच्या असाव्यात व त्या खारफुटीच्या बफर झोन क्षेत्रापासून दूर असाव्यात, अशी अट घातली आहे.
'घाट आरती'च्या विकासात पूजा मंडप, आरती डेक, बसण्याची जागा, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया आणि पर्यटक माहिती केंद्र, तरंगती जेटी, लहान बोटी आणि फेरी रॅम्प बांधण्याचा समावेश असणार आहे.
खारफुटी बफर झोनमध्ये कोणतीही बांधकामे उभारली जाणार नाहीत, या अटीवर प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. खारफुटी बफर झोन पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने विकासाच्यादृष्टीने टाळावे, असे जीसीझेडएमएने म्हटले आहे.
स्थानिक रहिवाशांसाठी आवश्यक असल्यास, २०११ च्या सीआरझेड अधिसूचना अंतर्गत ‘नोडेव्हलपमेंट’ झोनसह विकास करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली आहे.
हा प्रकल्प दहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पर्यटन विभागाने ‘दाराशॉ अँड कंपनी’ला या प्रकल्पासाठी आर्किटेक्ट आणि सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी बांधकामाचे पर्यवेक्षण करेल आणि आरती घाटासाठी सर्व डिझाइन प्रदान करेल.
आरती हा एक पवित्र हिंदू समारंभ आहे ज्यामध्ये दिवे लावणे, तालबद्ध मंत्र, धूप, भजन आणि प्रार्थना यांचा समावेश आहे.
डिचोलीतील नार्वे परिसरात सुप्रसिद्ध श्री सप्तकोटेश्वर मंदिर आहे. जे भगवान शिवाला समर्पित आहे आणि अलीकडेच त्याची पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. भगवान शिवाचे एक रूप असलेले भगवान श्री सप्तकोटेश्वर हे बाराव्या शतकाच्या सुमारास कदंब राजवटीतील प्रमुख देवतांपैकी एक होते.