कंत्राटाचे नूतनीकरणच नाही; मडगाव पालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार

पुकारले काम बंद आंदोलन; नगराध्यक्षांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
कंत्राटाचे नूतनीकरणच नाही; मडगाव पालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार

मडगाव: मडगाव नगरपालिकेतील (MMC) रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कंत्राट रविवार, २ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला, मात्र त्याचे अद्याप नूतनीकृत करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रोजंदारी कामगारांनी सोमवारी कामावर येण्यास स्पष्टपणे नकार देत काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राट नूतनीकरणाचा आदेश तसेच केलेल्या कामाचा योग्य मोबदला तातडीने द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

माजी नगराध्यक्षांचा कामगारांना पाठिंबा

माजी नगराध्यक्ष साविओ कुतिन्हो यांनी या रोजंदारी कामगारांना पाठिंबा दर्शवला असून, भीमशक्ती संघटनेतर्फे त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. कुतिन्हो यांनी यावेळी पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रोजंदारी कामगारांना तात्पुरता (Temporary) दर्जा देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण त्यांच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या घेऊनही ते आश्वासन पूर्ण झाले नाही. आता सुपरवायझर त्यांना काम सुरू करण्यास सांगत आहेत आणि आदेश एक ते दोन महिन्यांनी मिळेल असे सांगत आहेत. या दरम्यान त्यांना काही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.

तसेच, १५ ते २० वर्षे रोजंदारीवर काम केलेल्यांना तात्पुरता दर्जा देण्याचे आश्वासनही पाळले जात नाहीये. यापूर्वी १४ कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा आदेश काढून तो मागे घेण्यात आला होता, तसेच न्यायालयाच्या आदेशानंतरही कायमस्वरूपी करण्याचा आदेश तीन महिने पूर्ण होऊनही जारी केलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. ऑक्टोबरमध्ये सुटीच्या दिवशी काम करूनही त्यांना केवळ २६ दिवसांचा पगार दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षांकडून कामावर रुजू होण्याचे आवाहन आणि कारवाईचा इशारा

दरम्यान, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी कामगारांना त्वरीत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. पालिकेची तसेच सरकारची कामाची प्रक्रिया सुरू असते आणि आदेश येण्यासाठी एखादा दिवस पुढेमागे होऊ शकतो. रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबतच्या खर्चाला मंजुरी मिळून आदेश तयार आहे. त्यांना ब्रेक देण्याचा कोणताही प्रकार होणार नाही आणि त्यांना तात्पुरता दर्जा दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरोडकर यांनी स्पष्ट केले की, 'कामगारांना कुणीतरी भडकवले असले तरी जे कामगार कामावर येणार नाहीत, त्यांची गय केली जाणार नाही आणि त्यांना भडकवणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. हा सर्व प्रकार नोंद करून ठेवला जाईल', असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा