परंपरेला छेद देत 'ब्लू सिटी'मध्ये लिहिला नवा अध्याय

जोधपूर (राजस्थान): 'ब्ल्यू सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील जोधपूर शहरात, राजपूताना शौर्याचे आणि परंपरेचे प्रतीक असलेला १४ व्या शतकातील मेहरानगड किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्ला शतकानुशतके चालत आलेल्या पुरुषप्रधान परंपरांना छेद देणाऱ्या एका महिलेसाठी धैर्याचा मंच ठरला आहे. हेमकुंवर शेखावत या एकेकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या टुरिस्ट गाईड क्षेत्रात पाऊल ठेवून मेहरानगड किल्ल्यातील पहिल्या महिला पर्यटक गाईड ठरल्या आहेत.

संकटकाळात घेतले धाडसी पाऊल
जवळपास दहा वर्षांपूर्वी हेमकुंवर यांच्या पतीने आजारपणामुळे किल्ल्यातील परवानाधारक टुरिस्ट गाईडचे काम पुढे चालवणे शक्य नव्हते. त्यावेळी कोणताही पूर्वानुभव नसताना आणि मनात संकोच असूनही हेमकुंवर यांनी कुटुंबासाठी पुढे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, "माझ्यासमोर कोणतेही आदर्श नव्हते, राजपूत महिलांसाठी असे काम ऐकिवातही नव्हते. पण कुटुंबासाठी मला काहीतरी करणे गरजेचे होते."

प्रशिक्षणाने मिळवली नवी ओळख
कला पदवीधर आणि अध्यापनाचा अनुभव असलेल्या हेमकुंवर यांनी हळूहळू या विस्तीर्ण किल्ल्याच्या नाजूक कोरीव कामातून आणि जोधपूर शहरावर नजर ठेवणाऱ्या या किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाविषयी पर्यटकांना मार्गदर्शन करण्याच्या बारकाव्यांवर प्रभुत्व मिळवले.

त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि किल्ल्याच्या वारशाबद्दलच्या सखोल ज्ञानामुळे त्यांना राज्य सरकारचीही मान्यता मिळाली. राजस्थान सरकारकडून कुशलतेनुसार टुरिस्ट गाईडना दिले जाणारे प्रतिष्ठित ग्रीन कार्ड त्यांना अधिकृतपणे देण्यात आले आहे. पुढील प्रशिक्षणानंतर त्या आता यलो कार्डसाठीही पात्र ठरल्या आहेत, यामुळे त्यांना राज्य पर्यटनाच्या अनेक कामांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
इतर महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्रोत
सध्या भाषेच्या मर्यादांमुळे हेमकुंवर परदेशी पर्यटकांशी गाईड म्हणून व्यवहार करत नसल्या तरी, त्यांच्या चिकाटीने इतर महिलांनाही मोठी प्रेरणा दिली आहे. एकेकाळी संकोचाने घराबाहेर पडणाऱ्या या महिलेची वाटचाल आज चिकाटीचे प्रतीक बनली आहे.
हेमकुंवर यांनी सांगितले की, "लोकांनी मला इथे आत्मविश्वासाने काम करताना पाहिलं, तेव्हा आणखी काही महिला पुढे आल्या. आज, जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना मेहरानगडच्या कथा सांगणाऱ्या जवळपास शंभर टुरिस्ट गाईडमध्ये चार अन्य महिला सामील झाल्या आहेत." शांत किल्ल्याच्या दालनांपासून ते पर्यटकांनी गजबजलेल्या अंगणापर्यंत, हेमकुंवर यांनी केवळ स्वतःचा आत्मविश्वासच वाढवला नाही, तर इतर महिलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले.

बंगळुरूजवळ असलेल्या वैद्यकीय कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. मेहरानगड किल्ल्याप्रमाणेच उच्च गगनाला भिडत त्यांनी फक्त राजस्थानच नव्हे तर देशातील महिलांसमोर हेमकुंवर शेखावत यांनी एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.