पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार

मुंबईत थरार : सर्व शाळकरी मुलांची सुखरूप सुटका

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
30th October, 09:39 pm
पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार

मुंबई : मुंबईतील पवई परिसरात गुरुवारी एका व्यक्तीने शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. पवई येथील आरए स्टुडिओत ऑडिशनसाठी आलेल्या १७ लहान मुलांसह दोन पालकांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ बचावकार्य सुरू केले.
मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्य आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही क्रॉस गोळीबार केला. या गोळीबारात आरोपी रोहित आर्य जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय आहे नेमके प्रकरण?
दुपारी २ वाजताच्या सुमारास आरए स्टुडिओत ही घटना घडली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गेल्या ४-५ दिवसांपासून शाळकरी मुले ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत प्रशिक्षणासाठी येत होती. दुपारच्या जेवणासाठी मुलांना सोडल्यानंतर रोहित आर्यने त्यांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेल्यांमध्ये १५ वर्षांखालील १७ मुले-मुली आणि दोन पालकांचा समावेश होता.
दरम्यान, मुलांची सुटका झाल्यानंतर त्यांना आणि पालकांना पवई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. मुले थोडी घाबरलेली असली तरी सुरक्षित असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.‍
प्रकल्पात झालेल्या नुकसानीतून कृत्य
आरोपी रोहित आर्यने एक व्हिडिओ जारी करून मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत, असे स्पष्ट केले. रोहित आर्यने शिक्षण विभागासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ नावाचा एक प्रकल्प कर्जावर केला होता. या प्रकल्पाचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत आणि त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या आर्थिक नुकसानीकडे आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचे यशस्वी बचावकार्य
दुपारी पावणे दोन वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. तत्काळ स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. अखेर पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून खोलीत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने सर्व १९ जणांची (१७ मुले, १ प्रौढ आणि १ स्थानिक) सुखरूप सुटका करण्यात आली. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान एक ज्येष्ठ नागरिक महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाल्या.

हेही वाचा