पणजी पोलिसांची कारवाई : संशयिताची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

दरोडा प्रकरणातील संशयित माहम्मूद अलीला पोलीस स्थानकात नेताना पोलीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर दरोडा आणि म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोडा घालण्यासाठी रेकी करणारा आणि दरोडेखोरांच्या टोळीला मदत करणारा संशयित माहम्मूद अली (४६, रा. कळंगुट, मूळ रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) याला पणजी पोलिसांनी अटक केली. संशयिताला पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
नागाळी-दोनापावल येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर २० एप्रिल २०२५ रोजी उत्तरारात्री दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षकावर हल्ला केला होता. तसेच धेंपो दाम्पत्यांना कोंडून घालून पैसे आणि दागिन्यांची लूट केली होती. जाताना दरोडेखोरांनी घरातील सीसीटीव्ही रेकॉर्डर पळवून नेले. तसेच सुमारे एक किलो दागिन्यांसह २ लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी नेली होती.
७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. घाणेकर कुटुंबियांना बांधून घालून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवला होता. या प्रकरणात दरोडेखोरांना मदत करणारे संतोष बाबू बी. (२७) व सफिकुल रोहुल अमीर (३७, दोघेही रा. इब्बलुरू बंगळुरू) या बांगलादेशी नागरिकांना म्हापसा पोलिसांनी मंगळवार, १४ रोजी अटक केली होती. त्यांची उत्तर गोवा पोलीस आणि गुन्हे शाखेने चौकशी केली. तांत्रिक तपासानंतर संशयित माहम्मूद अली याचा वरील दरोड्यात सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता संशयित माहम्मूद अलीने बंगल्याची रेकी करून दरोडेखोरांना माहिती दिल्याचे समोर आले. वरील दरोड्यातील मुख्य संशयितांशी त्याचे जवळचे संबंध असून फरार बांगलादेशी दरोडेखोरांना संशयिताने मदत केल्याचे उघड झाले. गुन्ह्यापूर्वी आणि नंतर त्याने मुख्य संशयितांना आश्रय दिला होता. पोलिसांनी संशयित माहम्मूद अलीला अटक केली. त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
संशयिताचा इतर गुन्ह्यांतही सहभाग स्पष्ट
संशयित माहम्मूद अली याचा वेर्णा पोलीस स्थानकाच्या एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
कोलवाळ तुरुंगात असताना संशयित अली आणि इतरांनी दोनापावला, म्हापसा व इतर ठिकाणी दरोडा घालण्याचा प्लॅन केला होता.
२२ मे २०२३ रोजी माहम्मूद अली आणि इतरांनी विद्यानगर- जुवारीनगरच्या एमईएस महाविद्यालय मार्गावर ‘जयमाला’ बंगला फोंडण्याचा प्रयत्न केला होता. माहिती मिळताच वास्कोचे तत्कालीन उपनिरीक्षक स्वप्नील नाईक चालक यशवंत देसाई व गृहरक्षक प्रल्हाद नाईक यांच्यासह बंगल्याच्या दिशेने गेले होते. चोरांनी उपनिरीक्षक नाईक यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात माहम्मूद अलीला अटक झाली होती.
लोटलीतील आंबोरा भागात चॅपलजवळ बसलेल्या वृद्धेच्या हातातील बांगड्या आणि त्याच भागात दुचाकीवर बसलेल्या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळीही चोरांनी पळवली होती.