कृषी संचालक : विभागीय अधिकारी करणार प्रत्यक्ष पाहणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अवकाळी पावसामुळे बार्देश आणि सासष्टी तालुक्यांसह राज्यातील बहुतांश भागातील भाताची रोपे आडवी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांच्या फोटोसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.

दिवाळीपूर्वी झालेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून ४० ते ५० टक्के रोपे आडवी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘शेतकरी आधार निधी’ योजनेअंतर्गत नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. कृषी विभागाने नुकसानीची नोंद घेण्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले असून, अर्जासोबत शेतातील नुकसानीचे फोटो सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित विभागीय अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानुसार नुकसानभरपाई निश्चित केली जाईल, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
नुकसानीची भरपाई प्रति हेक्टर ४० हजार रुपयांपर्यंत मिळणार असून, कमाल चार हेक्टर क्षेत्रापर्यंतच भरपाईचा लाभ मिळू शकणार आहे. आडवे पडलेले भाताचे पीक यंत्राद्वारे कापणी करणे अशक्य असल्यामुळे शेतकऱ्यांना हाताने कापणी करावी लागत आहे. यामुळे मजुरीचा खर्च वाढला असून, नुकसानावर आणखी आर्थिक ओझे वाढले आहे.
यंदा पावसाचे प्रमाण सुरुवातीला समाधानकारक होते. त्यामुळे भरघोस उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे भात उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
_ संदीप फळदेसाई, संचालक, कृषी