पोरस्कडे-उगवे गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित मोकाटच

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : पोरसकडे न्हयबाग येथे तेरेखोल नदीमध्ये रेती व्यवसायातील वादातून दोन कामगारांवर गोळीबार केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहे. पेडणे पोलिसांनी रेती व्यवसायाशी संबंधित असलेले रॉबर्ट फर्नांडिस व अशोक मुळगावकर हे स्थानिक व्यावसायिक व पाच मजूर, अशा एकूण सात जणांना अटक केली. घटनेला दोन दिवस उलटले तरी गोळीबार प्रकरणाचा गुंथा सोडवण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
तेरेखोल नदीकिनारी परिसरात रेती व्यावसायिकांशी संबंधित ज्यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत, त्या सर्वांना पोलीस स्थानकावर बंदुकीसह उपस्थित राहण्याचा आदेश पोलिसांनी दिला होता. त्यानुसार आतापर्यंत ३५ बंदूकधारकांनी उपस्थिती लावली. सर्वांचे जबाब घेतले आहेत. तज्ज्ञांकडून या बंदुकांची तपासणी केली आहे. गुरुवारी २७ व्यावसायिक आणि मजुरांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. बुधवारी ४९ मजूर आणि रेती व्यावसायिकांची चौकशी केली होती. गुरुवारी २५ कामगार आणि व्यावसायिकांना बोलावून त्यांची चौकशी केली. त्यातील रॉबर्ट फर्नांडिस आणि अशोक मुळगावकर हे रेती व्यावसायिक आणि सोनेलाल चौधरी, मुन्ना बिन, सोनू पासवान, विकास बीन व योगेंद्र चौधरी हे पाच कामगार यांना पेडणे पोलिसांनी अटक केली.
दोन दिवसांपूर्वी पोरस्कडे उगवे या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या रामऋषी रामराज पास्वान व लाल बहादूर गौड या कामगारांवर एका गटाने गोळीबार केला होता. एक गोळी एकाच्या मानेतून, तर दुसऱ्याच्या हातातून आरपार झाली होती. दोघांवरही गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
पोरस्कडे गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधाराला लवकरच गजाआड केले जाईल.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री