सनरूफ तोडून दगड कारमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू

रायगडच्या ताम्हिणी घाटात भीषण अपघात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
सनरूफ तोडून दगड कारमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. चालत्या कारवर दगड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिला स्नेहल गुजराथी (वय ४३, रा. पुणे) अशी ओळख पटली आहे.
ही घटना ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाच्या हद्दीत घडली. सकाळच्या सुमारास स्नेहल गुजराथी आपल्या कुटुंबासह पुण्यावरून माणगावच्या दिशेने त्यांच्या आलिशान कारने प्रवास करत होत्या. घाटातील वळणदार रस्त्यावरून कार जात असताना अचानक डोंगरावरून मोठा दगड घसरत खाली आला. हा दगड थेट कारच्या छतावर (सनरूफवर) आदळला. दगडाचा वेग इतका जबरदस्त होता की त्याने सनरूफ फोडून थेट कारच्या आत प्रवेश केला आणि चालकाच्या शेजारी बसलेल्या स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यावर आदळला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तातडीने त्यांना जवळच्या मोदी क्लिनिकमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ताम्हिणी घाट परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घाटातील माती आणि मुरुम सैल झाल्याने दरडी आणि दगड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रशासनाने याआधीच या भागात दरड कोसळण्याच्या धोक्याची चेतावणी दिली होती.
काही काळ वाहतूक ठप्प
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, पावसामुळे घाटातील दगड सैल झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पावसाळ्यात ताम्हिणी घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी. या दुर्दैवी घटनेनंतर ताम्हिणी घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. नंतर दगड-गोटे हटवून मार्ग पुन्हा खुला करण्यात आला.

हेही वाचा