देशातील पहिले 'वंदे भारत स्लीपर कोच' देखभाल केंद्र जोधपूरमध्ये

३६० कोटींच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

Story: उमेश झर्मेकर | गोवन वार्ता |
5 hours ago
देशातील पहिले 'वंदे भारत स्लीपर कोच' देखभाल केंद्र जोधपूरमध्ये

जोधपूर (राजस्थान): केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उत्तर पश्चिम रेल्वेवर देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर कोच' देखभाल सुविधा (Maintenance Facility) जोधपूर येथे उभारली जात आहे. सुमारे ३६० कोटी रुपये खर्चून उभारली जाणारी इंडिया मेड ही अत्याधुनिक सुविधा पुढील वर्षअखेर तयार होणार असून, जून २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल.


बजट में जोधपुर रेलवे : भगत की कोठी स्टेशन बनेगा टर्मिनस, नई वंदे भारत और  अमृत भारत ट्रेनें चलेगी


उत्तर पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय तांत्रिक अभियंता मेजर अमित स्वामी यांनी ही माहिती दिली. 'भगत की कोठी' रेल्वे स्थानकावर हे अत्याधुनिक केंद्र उभारले जात असून, या सुविधेमार्फत आगामी काळात सुमारे २०० वंदे भारत स्लीपर कोचचे जाळे विकसित करण्याची योजना भारतीय रेल्वेची आहे.

देखभाल केंद्राचे दोन टप्पे आणि अत्याधुनिक सुविधा

हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे:

* पहिला टप्पा: ६०० मीटर ट्रॅक क्षमतेसह तयार होत असून, यात वंदे भारतच्या २४ स्लीपर कोचेसची देखभाल करण्याची सुविधा जून २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. यासाठी १७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.



* दुसरा टप्पा: यात १७८ मीटर ट्रॅक, कार्यशाळा (Workshop) आणि सिम्युलेटर सुविधेसह विविध सुविधांचा समावेश असेल. १९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा टप्पा जून २०२७ पर्यंत पूर्ण होईल.

या केंद्रात व्हील रॅक सिस्टीम, तसेच उच्च दर्जाचे उपकरण तपासण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटरसह प्रयोगशाळा असणार आहे. यामुळे भारतीय रेल्वेचा अचूकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर भर असल्याचे स्पष्ट होते, असे मेजर स्वामी यांनी नमूद केले. हा संपूर्ण प्रकल्प उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि कायनेट रेल्वे सोल्युशन (भारत-रशिया संयुक्त उपक्रम) यांच्या तांत्रिक भागीदारीत राबविला जात आहे.




अखंड देखभालीची यंत्रणा

मेजर स्वामी यांनी सांगितले की, हे केंद्र केवळ वंदे भारत स्लीपर कोचेसच्या देखभालीसाठी वापरले जाणार आहे, ज्यांचा परिचय लवकरच होणार आहे. या प्रकल्पात तीन-स्तरीय तपासणी व्यवस्था असून, एकाच वेळी तीन वंदे भारत गाड्यांची तपासणी व देखभाल या डेपोमध्ये करता येणार आहे.

ही सुविधा दररोज ८ ते ९ गाड्यांची देखभाल करण्यास सक्षम असेल.

कार्यशाळेत पूर्ण रेक उचलण्यासाठी प्रगत यंत्रणा, ड्रॉप पिट टेबलद्वारे बोगी ट्रान्सफर सिस्टीम आणि व्हील टर्निंग सिस्टीम अशी यंत्रणा उपलब्ध असेल, ज्यामुळे वंदे भारत गाड्यांची नियमित देखभाल अखंड सुरू राहील.




प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे गाडीची देखभाल या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. प्रत्येक वंदे भारत गाडीला चार दिवसांनी किंवा ३५०० किलो मीटरचा प्रवास पूर्ण झाल्यावर देखभालीसाठी या केंद्रांपैकी कोणत्यातरी ठिकाणी आणले जाईल. भारतीय रेल्वे अशा आणखी चार सुविधा देशभरात उभारणार आहे; यात दिल्लीतील बिजवासन आणि आनंद विहार, बेंगळुरूतील थानिसंद्रा आणि मुंबईतील वाडी बंदर येथील केंद्रांचा समावेश असेल.

हेही वाचा