१२ वर्षांचा संघर्ष; अखेर ठरला निर्दोष, न्यायालयातून बाहेर पडला आणि जीव सोडला

रायगडमधील मन हेलावून टाकणारी घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
१२ वर्षांचा संघर्ष; अखेर ठरला निर्दोष, न्यायालयातून बाहेर पडला आणि जीव सोडला

रायगड: तब्बल १२ वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यानंतर एका व्यक्तीला मारामारीच्या एका जुन्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली. मात्र, हा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच न्यायालयाच्या पायऱ्या उतरत असताना त्या व्यक्तीचा  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना रायगडमधील चोंढी गावात घडली आहे. एका तपाच्या न्यायालयीन संघर्षानंतर मिळालेल्या निर्दोषत्वाचा आनंद काही क्षणच टिकला.  या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

निकाल लागला आणि नियतीने घात केला

नितेश सुनील गुरव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. चोंढी गावात १२ वर्षांपूर्वी दोन गटांत झालेल्या मारामारी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर बुधवारी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि त्यांच्या काही साथीदारांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली, तर नितेश सुनील गुरव यांच्यासह काही जणांना निर्दोष मुक्त केले.

दीर्घ मानसिक ताण ठरला जीवघेणा

निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर नितेश गुरव हे न्यायालयाबाहेर आले. अनेक वर्षांच्या या कायदेशीर कटकटीनंतर त्यांची भावनिक अवस्था झाली होती. त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील दीर्घ मानसिक ताण, न्यायालयीन चढ-उतार आणि निकालाचा ताण त्यांना सहन झाला नाही. न्यायालयातून बाहेर येत पायऱ्या उतरताना त्यांच्या छातीत दुखू लागले.  तेथून झिराड येथे पोहोचल्यावर त्यांना छातीत जास्त त्रास जाणवू  लागले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न सुरू झाला, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. १२ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मिळालेल्या निर्दोषतेचा आनंद नितेश यांना काही क्षणच उपभोगता आला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेने न्यायालयीन संघर्षाचा आणि मानसिक खच्चीकरणाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

हेही वाचा