मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : संशयिताला सहा महिन्यांचा सक्त तुरुंगवास

मुंबई : महिलेला पाहून शिटी वाजवणे, तिची ओढणी खेचणे किंवा सार्वजनिक ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन करणे हे विनयभंगाच्याच गुन्ह्याच्या श्रेणीत येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईतील बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांचा सक्त तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या निर्णयामुळे टपोरी आणि रोडमजनूंना चपराक बसली असून, महिलांप्रती अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांना यापुढे कठोर शिक्षा होईल, असा संदेश न्यायालयाने दिला आहे. सदर घटना २२ एप्रिल २०१३ रोजी कांदिवली (पश्चिम) चारकोप परिसरात घडली होती. तक्रारदार महिला तेथे भगवती हॉस्पिटलजवळ पाणीपुरीची हातगाडी चालवत होती. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मदतीने तिने हा व्यवसाय सुरू केला होता. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आपली हातगाडी घेऊन निघाली असताना, तिने थोड्या वेळासाठी हातगाडी एका ठिकाणी उभी केली आणि जवळच्या दुकानात गेली. त्या वेळी आरोपी प्रशांत अरविंद गायकवाड हा आपल्या बहिणीसोबत तेथे आला आणि महिलेच्या हातगाडीचे नुकसान केले. महिलेला याची माहिती मिळाल्यावर ती ताबडतोब तिकडे धावली. त्यावेळी आरोपीने तिच्याशी वाद घालत तिची ओढणी खेचली आणि तिचा विनयभंग केला. ही घटना सार्वजनिक ठिकाणी भगवती हॉस्पिटलसमोरील फूटपाथवर घडल्याने परिसरातील लोकांनीही पाहिली.
बारा वर्षांनंतर न्याय
या प्रकरणात महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल झाले. तब्बल १२ वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने आरोपी दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या निवाड्यामुळे महिलांविषयी गैरवर्तन करणाऱ्यांना धडा शिकवणारा संदेश गेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा टवाळखोरांना जरब बसेल आणि महिलांची सुरक्षितता व सन्मान सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.