दोघा पोलिसांसह ५ जणांना अटक

उगवे बेकायदा रेती उपसा वादातून गोळीबार : शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
दोघा पोलिसांसह ५ जणांना अटक

संशयित आरोपींना न्यायालयात नेताना पेडणे पोलीस.


पेडणे : उगवे-जैतीर (पेडणे) येथे मंगळवारी मध्यरात्री तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्या बिहारमधील रामरिशी रामराज पासवान आणि लालबहादूर गोड या दोन कामगारांवर बंदुकीने गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी पाच स्थानिक आरोपींना रविवारी पहाटे अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, शस्त्र कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पेडणे पोलीस स्थानकावर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे आणि गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते. पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. नेहाल नितीन महाले (वय २०, उगवे), आशिष शिवाजी महाले (वय २४, उगवे), अक्ष अरुण महाले (वय २४, उगवे), ऋषिकेश दशरथ महाले (वय ३२, उगवे- आरबीआय पोलीस कर्मचारी), गंगाराम गोपीचंद महाले (वय ३४, उगवे- एटीएस कॉन्स्टेबल)
मंगळवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास, तेरेखोल नदीत बेकायदेशीर रेती उपसा करण्यासाठी कामगारांचा एक गट होडी घेऊन गेला होता. याच गटातील बिहारमधील रेती कामगार रामरिशी रामराज पासवान आणि लालबहादूर गोड यांच्यावर उगवे परिसरातील पाच जणांच्या गटाने बंदुकीने गोळीबार केला. यात पासवान यांच्या मानेला आणि गोड यांच्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले होते. पोलिसांना ठोस पुरावे मिळण्यास विलंब झाल्याने हल्लेखोरांना पकडण्यास उशीर झाला. मात्र, सखोल तपासानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे या पाच आरोपींना अटक केली.
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले की, तेरेखोल नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा सुरू आहे. मात्र, कायद्याने रेती काढण्यास बंदी असतानाही हा व्यवसाय सुरू असल्याने आणि उगवे भागातील नागरिकांचा या व्यवसायाला विरोध असल्याने हा हल्ला झाला, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
या प्रकरणात आणखी कोणी गुंतले आहेत का, त्यांचाही शोध सुरू आहे. तसेच, गोळीबार कोणी केला आणि कुठल्या बंदुकीने केला याबाबत चौकशी सुरू आहे. बेकायदेशीर रेती व्यवसायात गुंतलेल्या न्हाईबाग आणि पोरस्कडे भागातील रेती व्यावसायिकांचीही चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी रॉबर्ट फर्नांडिस आणि अशोक मुळगावकर या रेती व्यावसायिकांना बेकायदेशीर रेती व्यवसायाबद्दल अटक करण्यात आल्याची माहितीही अधीक्षक गुप्ता यांनी दिली.
दोघा पोलिसांचे होणार निलंबन
अटक केलेल्या पाच जणांपैकी ऋषिकेश महाले हे आरबीआय पोलीस कर्मचारी आहेत, तर गंगाराम महाले एटीएसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. सरकारी नियमांनुसार या दोघांवरही योग्य कारवाई करण्यात येणार असून, गोळीबारात सहभागी असलेल्या या दोन्ही पोलिसांचे निलंबन होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
रेती व्यवसायातील स्पर्धेतून गोळीबार
प्राथमिक तपासातून हा हल्ला रेती व्यवसायातील स्थानिक स्पर्धेतून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोरसकडे-उगवे भागात रेती व्यवसायात मोठी स्पर्धा वाढली आहे. रात्रीच्या वेळी एकमेकांच्या हद्दीत घुसून रेती उपसा केला जात असल्याने अनेकदा वादविवाद आणि मारामारीच्या घटना घडत होत्या. २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील परिसरात रेती व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादामधूनच दुसऱ्या दिवशीच्या हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.