सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मितीत गोव्याची देशात आघाडी

नीती आयोगाचा अहवाल : हॉटेल, रियल इस्टेट क्षेत्रात गोवा अव्वल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मितीत गोव्याची देशात आघाडी

पणजी : गोव्यात सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मिती सर्वाधिक आहे. सेवा क्षेत्राची आणखी विभागणी केल्यास हॉटेल, खाद्यपदार्थ व पेयपान तसेच रियल इस्टेट आदींमध्ये रोजगार निर्मितीत गोवा देशात आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गोव्यातील सेवा क्षेत्रातील एकूण रोजगारापैकी १८.६ टक्के रोजगार हॉटेलमधून तर ३.८ टक्के रियल इस्टेट क्षेत्रातून आला होता. नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या भारताचे सेवा क्षेत्र या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गोव्यात एकूण रोजगरापैकी रियल इस्टेट क्षेत्रातील ३.८ टक्के रोजगार आहे. याची राष्ट्रीय सरासरी केवळ ०.७ टक्के आहे. गोव्यात घाऊक आणि किरकोळ व्यापार सेवा क्षेत्रात सर्वाधिक २८.८ टक्के रोजगार आहे. याची राष्ट्रीय सरासरी ३४.४ टक्के आहे. यानंतर गोव्यात विविध पद्धतीची वाहतूक आणि वेअरहाउस यामध्ये १२ टक्के, शिक्षण क्षेत्रात १०.४ टक्के, सार्वजनिक प्रशासन आणि लष्करी क्षेत्रातील रोजगार ६.७ टक्के रोजगार आहे.
याशिवाय गोव्यातील एकूण रोजगारापैकी आरोग्य आणि सामाजिक कार्य क्षेत्रात ४.३ टक्के, विविध प्रकारच्या घरगुती कामांद्वारे रोजगार ५.९ टक्के, व्यवसायिक, वैज्ञानिक किंवा तांत्रिक क्षेत्रात २.८ टक्के, आर्थिक व विमा सबंधित सेवा २.१ टक्के, सहायक सेवा क्षेत्रात १.९ टक्के तर अन्य सेवा क्षेत्रात १.२ टक्के रोजगार आहे. गोव्यात सर्वात कमी रोजगार कला, करमणूक (०.५ टक्के), माहिती आणि दळणवळण (१.१ टक्के) या दोन क्षेत्रात असल्याचे अहवालात नमूद केले आहे.