वार्षिक २,८०० कोटी रुपयांचे मिळते उत्पन्न : व्यावसायिक जहाज क्षेत्रात ४० टक्के वाटा

पणजी : गोवा राज्य (Goa) देशातील जहाज बांधणी क्षेत्रात जहाज बांधणीमध्ये (ship building) तिसऱ्या स्थानावर आहे, तर सर्वाधिक उत्पन्न मिळविण्यात दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यातील जहाज बांधणी क्षेत्रातून वार्षिक ३२० दशलक्ष यूएस डॉलर्स इतके उत्पन्न तयार होते. राज्यातील ३३ उद्योग जहाज बांधणी क्षेत्रात कार्यरत आहेत, अशी माहिती बंदर कप्तान खात्याच्या (captain of ports) अहवालातून मिळाली आहे.
खात्याच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, व्यावसायिक जहाज क्षेत्रात गोव्याचा सर्वाधिक ४० टक्के वाटा आहे आणि गोव्याच्या जहाज बांधणी उद्योगातून वार्षिक ३५० दशलक्ष (मिलियन) डॉलर म्हणजे २,८०० कोटी रुपये इतके उत्पन्न तयार होते.      
जहाज बांधणीत ३ हजारांहून अधिक रोजगार
राज्यातील जहाज बांधणी क्षेत्रातून ३ हजारपेक्षा अधिक थेट रोजगार आणि १८ हजार अप्रत्यक्ष रोजगार तयार झाले आहेत. गोव्याची एकूण जहाज बांधणी क्षमता ५५,००० डेडवेट टनेज (डीडब्ल्यूटी) इतकी आहे आणि या क्षमतेमुळे गोवा हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जहाज बांधणी क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर आहे.      
राज्यातील जहाज बांधणी क्षेत्र दर डीडब्ल्यूटी मागे ५.१८ लाख रुपये इतके उत्पन्न उभे करते आणि दर डीडब्ल्यूटी मागे सर्वाधिक उत्पन्न तयार करण्यात गोवा हे दुसऱ्या स्थानावर आहे.      
३३ पैकी १३ उद्योग शिपयार्ड
राज्यातील ३३ जहाज बांधणी क्षेत्रातील उद्योगांपैकी १३ उद्योग शिपयार्ड आहेत, १२ उद्योग यंत्रसामग्री पुरवणारे आहेत आणि ८ उद्योग हे डिझाईन इंजिनिअरिंग करणारे आहेत.